युतीने नाकारलेली फाईल काँग्रेसच्याच ‘आदर्श’ नेत्यांनी उघडली

November 16, 2010 10:13 AM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी प्रकरणामुळे अशोक चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्याच आदर्श सोसयटीची फाईल युती सरकारच्या काळात नाकारण्यात आली होती. हीच फाईल काँग्रेसच्याच 'आदर्श' नेत्यांनी पुन्हा उघडली.

आदर्श सोसायटील महाराष्ट्र सरकारने 1997 मध्येच प्लॉट नाकारला होता.

ही सोसायटी उभारणे म्हणजे समुद्रावर आक्रमण करण्यासारखे होईल असा शेरा मारुन फाईल बंद करण्यात आली होती.

तरीसु्‌दधा भ्रष्ट राजकारणी आणि अधिकार्‍यांनी मिळून ही सोसायटी उभारली.

आदर्श सोसायटीची जमीन समुद्राच्या भरती रेषेत येत असल्यामुळे सी आर झेड कायद्याचे उल्लंघन होत होते असे म्हणून युती सरकारने प्लॉट नाकारला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या सह्या असलेल्या या फाईलीमध्ये पर्यावरणाशी संबंधित सर्व आक्षेप नमूद करण्यात आले आहेत.

त्यामध्ये हा प्लॉट कोणत्याही गृहनिर्माण संस्थेस देणे योग्य होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते.

युती सरकारने रद्द केलेली आदर्शची फाईल नंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस सरकारच्या काळात पुन्हा उघडण्यात आली.

त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित सर्व आक्षेप झुगारुन ही इमारत पूर्ण करण्यात आली

आदर्शचा घोटाळयाला बेस्टची साथ

आदर्श सोसायटीत झालेला गैरप्रकार हा बेस्टच्या साथीनंच झाला आहे. याचे पुरावे आयबीएन लोकमतला मिळाले. बेस्टचे तेव्हाचे महाव्यवस्थापक स्वाधीन क्षत्रिय यांनीच बेस्ट डेपोचा एफएसआय वापरण्यासाठी एनओसी दिले होते.

यामुळे बेस्टचे सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आदर्श सोसायटी ज्या जागेवर उभारण्यात आली ती जागा रस्त्यासाठी राखीव होती. इथे 61 मीटर रुंदीचा रस्ता होणार होता.

पण आदर्शच्या सदस्यांनी हा रस्ता 60.97 मीटरऐवजी 18 मीटर करण्याची विनंती राज्य सरकारला केली. त्यांची ही विनंती मंजूरही झाली. पण हा एफएसआयही सोसायटीला पुरणार नव्हता.

मग सोसायटीची नजर गेली बेस्ट डेपोलगतच्या रस्त्याच्या प्लॉटवर. बेस्टच्या या डेपोशेजारी 2700 स्केअर मीटर जागेवर बेेस्टचा रस्ता होता.त्या प्लॉटचा एफएसआय आदर्श सोसायटीने लाटला.

त्यासाठी तेव्हाचे बेस्टचे महाव्यवस्थापक स्वाधीन क्षत्रिय यांनी मदत केली. पण आता या घोटाळ्याशी आपला काहीही संबध नाही असे क्षत्रिय म्हणत आहे.

पण स्वाधीन क्षत्रिय यांचा दावा खोटा आहे. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की बेस्टने या प्लॉटसाठी एनओसी दिले आहे. क्षत्रिय यांच्या या एनओसीमुळे बेस्टचे सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बेस्टची जागा होती.. 2700 चौरस मीटर त्याचा एफएसआय आदर्शला देण्यात आला. आदर्शने 2,758 चौरस मीटर वर 1.33 नुसार अंदाजे 29 हजार 700 चौरस फूट एफएसआय घेतला.सुपर बिल्टअप एरियानुसार तो अंदाजे 45 हजार स्केअर फूट झाला.

कफ परेड परिसरात दर फुटाचा भाव आहे. 50 हजार रुपये त्यानुसार 45 हजार चौरस फुटाची किंमत अंदाजे 200 कोटी रुपये इतकी होते.

close