कलमाडींना अटक होणार ?

November 16, 2010 5:08 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने काल (सोमवारी) टी एस दरबारी आणि संजय महेंद्र यांना अटक केला होती.आज कोर्टापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चक्क कलमाडींकडे बोट दाखवले आहे.

त्यामुळे आता कॉमनवेल्थ आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना कधीही अटक होऊ शकते, असे बोलले जात आहे.

सुरेश कलमाडींचे समर्थक टी. एस. दरबारी आणि संजय महेंद्रू यांनी त्यांच्या चौकशी दरम्यान सुरेश कलमाडींच्याच सांगण्यावरुन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्याचे म्हटले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या दोघांची कोर्टाने 22 नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली. क्वीन्स बॅटन रिले संदर्भातले कंत्राट कुठल्याही टेंडरशिवाय केवळ एका ईमेल द्वारे दिले गेल्याचे तपास यंत्रणांनी आज कोर्टात सांगितले.

सुरेश कलमाडींच्या सांगण्यावरुनच आपण ही सगळी चुकीची काम केली. जर आपल्या बॉसनेच आपल्याला ही काम करायला सांगितल्याने ती काम आम्हाला नाकारता आली नाहीत, असंही या दोन अधिकार्‍यांनी आपल्या चौकशी दरम्यान सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉमनवेल्थ युथ गेम्सप्रकरणी कॅगकडून चौकशी

एकीकडे कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी अडचणीत आले असताना आता पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्सप्रकरणीही कॅगने चौकशी सुरू केली.

पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण केले गेले आहे. काल रात्री अचानक दिल्लीहुन कॅगची टीम आली आणि त्यांनी ही चौकशी केली.

या चौकशी दरम्यान काही कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.गेम्ससाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालीकेने खर्च केलेल्या पैशाचे पूर्ण हिशेब देण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे.

पण कॅगच्या अधिकार्‍यांना योग्य ती माहिती दिल्याचा दावा महानगरपालिकेचे आयुक्त करत आहे.

close