बजरंगाची कमाल गोल्डची धमाल

November 19, 2010 2:40 PM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर

चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय रोईंग टीमनं इतिहास रचला आहे. रोईंगमध्ये आज भारतानं गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. भारताच्या बजरंगलाल ठक्करनं पुरुषांच्या स्कल्स रोईंग प्रकारात गोल्डन कामगिरी केली. रोईंगमध्ये गोल्ड मेडलची कमाई करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तिसर्‍या लेनमधून सुरूवात करताना ठक्करने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. भारतीय आर्मीमध्ये अधिकारी असणार्‍या ठक्करने 7 मिनीट आणि 4.78 सेंकंदाची वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.

तर दूसरीकडे भारताच्या पुरुष टीमनं सिल्व्हर मेडल पटकावलं. 2000 मीटर स्पर्धेत भारताच्या आठ खेळाडूंच्या टीमनं सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. या स्पर्धेत चीननं गोल्ड मेडल पटकावलं. भारतीय टीममध्ये गिरिराज सिंग, सैज थॉमस, लोकेश कुमार, मनजीत सिंग, राजेश कुमार यादव, रणजीत सिंग, सतिश जोशी आणि जेनिल क्रिशनन या खेळाडूंचा समावेश आहे. या टीमनं 12 मिनिटं सहा सेकंदांची वेळ नोंदवली.

महिला गटात ब्राँझ मेडल

एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष टीमपाठोपाठ भारतीय महिला टीमनंही ऐतिहासिक कामगिरी केली. महिलांच्या जोडीनं रोईंगमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली. या प्रकारात भारतीय महिलांनी मेडल पटकवण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रतिमा पुहाना आणि प्रमिला प्रवा मिंझ या भारतीय महिला जोडीने 7 मीनिटं आणि 47.50 सेकंदाची वेळ नोंदवत ब्राँझवर कब्जा केला. चीनने यामध्ये गोल्ड मेडलची कमाई केली तर कझाकिस्तानने सिल्व्हर मेडल पटकावलं.

close