आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ‘सोनेरी’ दौड

November 21, 2010 3:24 PM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर

एशियन गेम्समध्ये आज भारताने तिसर्‍या गोल्ड मेडलची नोंद केली. 3 हजार मीटर स्टेपल चेज रनिंग प्रकारात भारताने गोल्ड मेडलची नोंद केली. भारताच्या सुधा सिंहने ही गोल्डन कामगिरी केली. सुधा सिंहने 9 मिनिट आणि 55 पूर्णांक 56 सेकंदाची वेळ नोंदवली. सुधा सिंहची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. एशियन गेम्समध्ये भारताने पटकावलेले हे पाचवे गोल्ड मेडल ठरले आहे.

ऍथलेटिक्समध्ये पहिल गोल्ड

एशियन गेम्समध्ये भारतीय महिला ऍथलिट्सनं ऐतिहासिक कामगिरी केली. ऍथलेटिक्समध्ये भारताने आपले पहिले गोल्ड जिंकले. दहा हजार मीटर रनिंगमध्ये भारताच्या प्रीजा श्रीधरनने गोल्ड तर त्याच प्रकारात महाराष्ट्राच्या कविता राऊ तने सिल्व्हर मेडल जिंकले. इथिओपियाच्या ऍथलीट्स या स्पर्धेत सुरुवातीला आघाडीवर होत्या. पण शेवटच्या निर्णायक टप्प्यात प्रीजाने जोरदार मुसंडी मारली. कविताही सुरुवातीला पाचवी होती. पण तिनेही इथिओपिअन ऍथलीटला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला. प्रीजाने या स्पर्धेत आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळही नोंदवली. दहा हजार मीटरचे अंतर तिने 31 मिनिटं पन्नास पूर्णांक 47 शतांश सेकंदात पार केले. कविता राऊतने दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही दहा हजार मीटर शर्यतीत ब्राँझ मेडलची कमाई केली होती.

महिला तिरंदाजी टीमला ब्राँझ मेडल

ऍथलेटिक्स आणि शुटिंग पाठोपाठ तिरंदाजीतही महिला टीमने भारताच्या खात्यात ब्राँझ मेडलची भर टाकली. डोला बॅनर्जी, दीपिका कुमारी आणि रिमिल बिरुली यांना सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाकडून थोडक्यात पराभव पत्करावा लागला. दोघांचे 221 पॉइंट्स झाल्यावर पेनल्टी शूट आऊटमध्ये कोरियन टीमने भारताला हरवले. त्यानंतर झालेल्या ब्राँज मेडलसाठीच्या मॅचमध्ये मात्र भारताने चीन तैपेई टीमचा एका पॉइंटने पराभव करत ब्राँझ पटकावले. खरंतर सुरुवातीला भारतीय टीम पिछाडीवर होती. पण शेवटच्या राऊंडमध्ये भारतीय टीमने जोरदार कमबॅक केले. आणि अखेर ही मॅच 218 विरुद्ध 217 पॉइंट्सनी जिंकली.

कुस्तीत दोन ब्राँझ मेडल

कुस्तीतही भारताने आज दोन ब्राँझ मेडलची कमाई केली. ग्रीको रोमन प्रकारात साठ किलो गटात भारताच्या रविंदर सिंगने ब्राँझ पटकावले. इंडोनेशियाच्या महम्मद अलियानसियाचा त्याने 3-1 ने पराभव केला. पहिल्या राऊंडमध्येच रविंदरने तीन पॉइंट्सची आघाडी घेतली होती. त्यानंतर आघाडी कायम राखत त्याने विजय मिळवला. तर 66 किलो गटात सुनील कुमारने थायलंडच्या स्युटेपचा पराभव करत ब्राँझ जिंकले. या मॅचमध्ये सुनीलने प्रतिस्पर्ध्याला एकही पॉइंट मिळू दिला नाही. मॅचवर त्याचं पूर्ण नियंत्रण होते. आणि पाच विरुद्ध शून्य पॉइंट्सनी त्याने थायी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.

हॉकीत बी ग्रुपमध्ये भारतीय टीम अव्वल स्थानावर

हॉकीतही भारतीय टीमचा सुरेख फॉर्म कायम आहे. टीमने सलग चौथी लीग मॅच जिंकताना आज जपानचा 3-2 ने पराभव केला. मॅचमध्ये सोळाव्या मिनिटाला गोल करत जपानने आघाडी घेतली होती. पण पहिला हाफ संपायला चार मिनिट बाकी असताना कॅप्टन राजपाल सिंगने गोल करत बरोबरी साधली. या गोलनंतर भारतीय टीमही सावरली. आणि मॅचवर त्यांनी नियंत्रण मिळवले. दुसर्‍या हाफमध्ये सुरुवातीलाच संदीप सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. संदीपनेच टीमचा तिसरा गोल केला. या स्पर्धेत संदीप तुफान फॉर्मात आहे. आणि चार मॅचमध्ये त्याने आतापर्यंत 9 गोल केले. जपानच्या साकामोटाने गोल करत भारताची आघाडी थोडी कमी केली. पण अखेर भारताने 3-2 ने ही मॅच जिंकली. बी ग्रुपमध्ये भारतीय टीम आता अव्वल स्थानावर आहे.

टेनिसमध्ये सोमदेवची घोडदौड सुरु

टेनिसमध्ये सोमदेव बर्मनने आज दोन मेडल पक्की केली. सिंगल्समध्ये त्याने सेमी फायनलमध्ये धडक मारली. तर डबल्समध्ये सनम सिंगच्या साथीने त्याने फायनल गाठली. महिलांमध्ये सानिया मिर्झाला मात्र आज सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. उझबेकिस्तानच्या अमनमुरादोव्हाने सानियाला 6-7, 6-3 आणि 6-4 ने हरवले. त्यामुळे सानियाला ब्राँझ मेडलवरच समाधान मानावे लागले. पुरुषांच्या सिंगल्समध्ये सोमदेवने सेमी फायनलमध्ये धडक दिली. क्वार्टर फायनलमध्ये आज त्याने झी झँगचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सोमदेवने कॉमनवेल्थ स्पर्धेत सिंगल्समध्ये गोल्ड पटकावले. आणि एशियन गेम्समध्येही त्याच्याकडून गोल्डची अपेक्षा करण्यात येते आहे. डबल्समध्ये सोमदेव आणि सनम सिंग यांनी सेमी फायनल मॅचमध्ये कोरियन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. करण रस्तोगीला मात्र सिंगल्समध्ये क्वार्टर फायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागला.

close