येडियुरप्पांचा फैसला सोमवारी

November 21, 2010 4:28 PM0 commentsViews:

21 नोव्हेंबर

कुटुंबिय आणि नातेवाईकांनी भूखंड लाटल्याचे प्रकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांना भोवण्याची चिन्ह आहेत. या संदर्भात आज सकाळी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गडकरी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात महत्वाची बैठक झाली. येडीयुरप्पांना संध्याकाळी दिल्लीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. पण येडीयुरप्पा आता आजच्या ऐवजी सोमवारी पहाटे दिल्लीला येणार आहेत. याप्रकरणी आता भाजपच्या कोअर कमेटीची बैठकही उद्याच होणार आहे.

येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यावरुन भाजमध्ये सध्या दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यास त्यांचे पुर्नवसन कस करायचे यावरही यावेळी चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री पद गेल्यास योग्य पुर्नवसनाची मागणी येडियुरप्पा यांनी भाजप हायकमांडकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पांनी मात्र राजीनाम्याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

काँग्रेसने येडियुरप्पांना टार्गेट केले- प्रकाश जावडेकर

भाजप येडियुरप्पा यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आदर्श घोटाळा आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसने येडियुरप्पांना टार्गेट केल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हंटले आहे.

येडियुरप्पा यांच्यानंतर कोण ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापुढे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उद्या सकाळी ते राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहायची आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा यायचे, असा येडियुरप्पांचा बेत दिसतोय. पण येडियुरप्पा यांच्यानंतर कोण असा मोठा प्रश्न आहे. कर्नाटकच्या विधानसभेत लिंगायत समाजातले आमदार जास्त आहेत. त्यामुळे ते लिंगायत समाजातल्या नेत्याला पाठिंबा देऊ शकतात.

पंचायत राजचे मंत्री जगदीश शेट्टार हे लिंगायत समाजातले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातं आहे. कायदामंत्री सुरेश कुमार हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. आणि कर्नाटक भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यांचंही नाव घेतलं जातं आहे.

close