पावसाचा मुक्काम वाढणार

November 22, 2010 2:37 PM0 commentsViews: 17

22 नोव्हेंबर

राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आणखी पाच ते सहा दिवस राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावरुन महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे येत्या एक दोन दिवसांमध्ये राज्यात सर्वदुर पाऊस पडणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत थंडीही लांबणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे वेधशाळेचे महासंचालक मजुमदार यांनी ही माहिती दिली.

राज्यभरात शेतीच प्रचंड नुकसान

राज्यभरात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे. नाशिक मध्ये काल रात्रभर झालेल्या पावसामुळे चेहडी बंधार्‍याची भिंत कोसळून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरल. गायधनी कुटुंबाचे पुर्ण शेत या पाण्यात वाहून गेल आहे. तरीही सकाळपासून प्रशासकीय अधिकार्‍यांनी याची दखल न घेतल्यामुळे श्रीधर गायधनी यांनी टॉवरवर चढून याचा निषेध केला. नाशिक महानगरपालिकेन बांधलेल्या चूकीच्या संरक्षण भिंतीमुळे बंधारा फुटल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यात रविवारपासून पुन्हा अवकाळी पावसानं सुरुवात केली. याचा फटका उरल्यासुरल्या द्राक्ष बागांना बसला आहे. शेतात काढणीला आलेल्या कांद्यासह नवीन कांद्याची रोपंही पूर्णत: सडून गेली. द्राक्ष आणि कांदा याच्याबरोबरचं इगतपुरी तालुक्यात भाताचे तर सिन्नर तालुक्यात टोमॅटोच्या बागांचे मोठ नुकसान झाले आहे.

विदर्भात कापूस आणि ज्वारीच नुकसान

विदर्भात कापूस आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापूस सध्या वेचणीला आला. पण पावसाने तो ओला झाल्यामुळे त्याचा भाव घसरतो. तर ज्वारी काळी पडल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने ती विकावी लागणार आहे. कांदा, सोयाबीन आणि धान या पिकाचंही पावसामुळे प्रचंड नुकसान झाल आहे.

सह्याद्रीच्या रांगात भातशेतीचे मोठ नुकसान

अवकाळी पावसामुळे सह्याद्रीच्या रांगांमधील खेड, जुन्नर, आंबेगाव या परिसरातील भातशेतीचे मोठ नुकसान झाले आहे. राज्यातील सर्वाधिक आदिवासी लोक या भागात राहतात. त्यामुळे या भागातील आदीवासींना फटका बसला आहे. ऐन पावसाळ्यात लागवडीच्या दिवसांत पाऊस कमी झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली होती. पण कापणीच्या वेळी सलग आठ दिवस पाऊस पडल्याने नुकसान झाले आहे. भातशेतीबरोबरचे पालेभाज्या, द्राक्षांच्या पिकांचंही नुकसान झाले आहे. जुन्नरमध्ये पालेभाज्यांचे पिकही धोक्यात आले आहे. यात कोथिंबीर, मेथी, फ्लॉवर , कोबी, वाल यांचा समावेश आहे.

मराठवाड्यात खरीप आणि रब्बी हंगामांना फटका

मराठवाड्यातील अडीच लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले. या पावसाचा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांना फटका बसला. कापूस,गव्हू,मका आणि सोयाबिन या पिकंाचे प्रचंड नुकसान झाले.आणि रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.अवकाळी पावसाने कापूस भिजल्याने कापसाचे प्रतवारी कमी झाली. त्यामुळे आता या कापसाला चांगला भाव मिळणार नाही. तूर,सोयाबिन या पिकांवर किड पडली. तर मका आणि गव्हू ही पीक आडवी झाली. फळबागंानासुध्दा या पावसाचा जबरदस्त फटका बसला. रब्बी हंगामात थोडीफार पेरणी झाली होती.

जळगावात उभी पिक भुईसपाट

जळगावच्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या अवकाळी पावसाच्या फटक्याने शिरसोली शिवारातील शेतकर्‍यांची उभी पिक पार भुईसपाट झाली. मका, हरबरा,पाणमळा, कपाशी यासंह केळीच्या बाग पार उध्वस्त झाल्या आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने आता नुकसानग्रस्त भागातील शेतीच्या पंचनाम्याचे काम सुरु झाले आहे. तहसीलदार प्रशाली जाधव यांनी या भागातील शेतीची पाहणी करुन पंचनाम्याचं काम सुरु केले आहे.

close