आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेवला दुसरं गोल्ड

November 23, 2010 4:09 PM0 commentsViews: 13

23 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेव देवबर्मनची विजयी घोडदौड कायम ठेवत आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन गोल्ड मेडल पटकावणारा एकमेव भारतीय ठरला. सोमदेवसाठी एशियन गेम्सचा हा अनुभव खास असेल. पुरुषांच्या डबल्स पाठोपाठ सिंगल्समध्येही त्याने गोल्ड पटकावलंय. एकतर्फी झालेल्या फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या अव्वल सिडेड डेनिस इस्टोमीनचा त्याने 6-1, 6-2 ने पराभव केला.

ऍथलेटिक्समध्ये ब्राँझ मेडल

एशियन गेम्समध्ये ऍथलेटिक्समध्ये भारताच्या खात्यात ब्राँझ मेडलची भर पडली. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत कृष्णा पुनियाकडून गोल्डची अपेक्षा होती. पण फायनलमध्ये चीनच्या ऍथलीटपेक्षा ती कमी पडली. खरंतर कॉमनवेल्थ गेम्सपेक्षा कृष्णाची कामगिरी वरची होती. 61 पूर्णांक 91 शतांश मीटरची नोंद तिने केली. पण चीनच्या यांगफेंग ली ने 66 मीटरच्या वर थाळीफेक करत गोल्ड पटकावलं. तर सिल्व्हर मेडल विजेत्या आयमीन साँगने 64 मीटर अंतर पार केलं. भारताची हरवंत कौर चौथी आली.

हॉकी टीमचा सेमी फायनलमध्ये पराभव

एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकी टीमला सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. सेमी फायनलमध्ये मलेशियाच्या टीमने भारताचा 4-3 ने पराभव केला. निर्धारित सत्तर मिनिटात 3-3 अशी बरोबरी झाल्यामुळे मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. पण एक्स्ट्रा टाईममध्ये पहिला गोल करत मलेशियाने बाजी मारली. भारतीय टीमचा या मॅचमध्येही खेळ चांगला झाला. संदीप सिंग, तुषार खांडेकर आणि राजपाल सिंग यांनी भारतातर्फे तीन गोल केले. दरवेळी भारताकडे आघाडी होती. पण मोक्याच्या क्षणी मलेशियाच्या खेळाडूंना रोखण्यात भारतीय टीम कमी पडली. एक्स्ट्रा टाईममध्ये मलेशियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आणि महम्मद रहीमने गोल करत मलेशियाला विजय मिळवून दिला. लीगमधल्या चारही मॅच सहज जिंकणार्‍या भारतीय टीमचं गोल्डचं स्वप्न मात्र त्यामुळे हवेत विरलं. आता ब्राँझ मेडलसाठी येत्या गुरुवारी भारताची गाठ कोरियाशी पडणार आहे. तर पाकिस्तान आणि मलेशिया दरम्यान गोल्ड मेडलची मॅच होईल.

close