संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज – आर. आर. पाटील

November 25, 2010 11:29 AM0 commentsViews: 13

25 नोव्हेंबर

कोणत्याही संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आणि त्यासाठी योग्य खबरदारी आणि व्यवस्था केल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर दोन वर्षांमध्ये मुंबईची सुरक्षा आणि पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

26/11 च्या हल्ल्यावरच्या राम प्रधान समितीनं अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानुसार बहुतेक सूचनांवर आधारित उपाययोजना करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. त्यानुसार पोलीस दलाचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली. पोलीस दलाच्या कारवाईसाठी नव्यानं स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवण्यात आली आहे. त्यानुसारच सध्या पोलीस यंत्रणा काम करत आहे.

अलिकडेच केंद्र सरकारनं एनएसजीची एक कंपनी मुंबईत एनएसजीच्या धर्तीवर फोर्स वन या अत्याधुनिक अतिरेकी हल्लाविरोधी पोलीस दल सुरू करण्यात आलं. तसेच गुप्तवार्ता विभागात नव्यानं सायबर मॉनिटरिंग सेल सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील कलिना इथली फोरेन्सिक लॅब अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे फोरेन्सिक, नार्को, ब्रेन मॅपिंग, इमेजिंग आणि इतर चाचण्यांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज उरलेली नाही.राज्याच्या पोलीस दलाला केद्र सरकारकडून दोन हजार बुलेट प्रुफ जॅकेट मिळाले आहेत. तर राज्य सरकारनंसुद्धा अलिकडेच आणखी जॅकेट घेण्यासाठी टेंडर मागवली आहेत.

मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये शिघ्रकृती दल अर्थात क्यूआरटी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत 26 तर, पुणे, नागपूर, ठाणे शहरात प्रत्येकी दोन आणि नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर शहरात प्रत्येकी एक क्यूआरटी तैनात करण्यात आली आहे. राज्यात 20 ठिकाणी बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. सागरी सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं 28 स्पीडबोटी राज्याला दिल्या आहेत, तर राज्य सरकारनं 5 स्पीडबोटी खरेदी केल्या आहेत. त्याच बरोबरच नजीकच्या काळात आणखी 24 स्पीड बोटी सागरी पोलीस दलात सामील होणार आहेत. या उपाययोजनांच्या पूर्तेतेमुळे मुंबई कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी सज्ज असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.

close