पदवीधर उमदेवारांचं भवितव्य मतपेटीत बंद

November 27, 2010 5:26 PM0 commentsViews: 18

27 नोव्हेंबर

जळगाव जिल्ह्यात 17 मतदान केंद्रात आज विधानपरिषदेसाठी मतदान पार पडलं. विधानपरिषदेसाठी 506 तर पदवीधर मतदारसंघासाठी 44 हजार मतदारांनी मतदान केलं. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 99.41 टक्के मतदान झालं तर पदवीधर मतदारसंघासाठी 42.61 टक्के मतदान झालं. जळगाव विधानपरिषद मतदासंघात सर्वाधिक चुरस आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मनीष जैन आणि भाजपचे उमेदवार आणि एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसे यांच्यात ही लढत होती.

मराठवाडा विभागात 78 टक्के मतदान

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विक्रम काळे यांना शिक्षक संघटनेचे प्रा. पी एस घाडगे, भाजप शिवसेना पुरस्कृत रमेश पोकळे यांनी आव्हान दिलं आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आठ जिल्हयातील 254 मतदान केंद्रावर मतदान झालं. हा मतदारसंघ सातत्यानंं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत आमदार वसंत काळे यांनी या मतदारसंघाची बांधणी केली. त्यांचे पुत्र आमदार विक्रम काळे यांचं भवितव्य ठरणार आहे. विभागात एकूण 78 टक्के मतदान झालं आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात 91 टक्के मतदान

विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातही आज मतदान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात 86 टक्के तर सिंधदुर्ग जिल्ह्यात 91 टक्के मतदान झालं आहे. एकूण 12 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते आणि शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे यांच्यात दिसून येत होती. ठाणे रत्नाग़िरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 27 हजार 753 मतदारांना या निवडणूकीत आपला मतदानाचा अधिकार बजावला.

यवतमाळमध्ये 99.67 टक्के मतदान

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार आहेत. एक लाख 40 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे प्रा. बी.टी.देशमुख यांच्यासमोर भाजप सेनेचे रणजित पाटील, संतोष ठाकरे, कमलाकर पायस असे प्रतिस्पर्धी आहेत. यवतमाळमध्ये 99.67 टक्के मतदान झालं.

उत्तर महाराष्ट्रात थेट लढत

उत्तर महाराष्ट्रातल्या पदवीधर मतदार संघासाठी मतदान झालं. भाजपचा पारंपरिक मतदार संघ मानल्या गेलेल्या या परंपरेला संगमनेरचे डॉक्टर सुधीर तांबे यांनी गेल्या वेळी छेद दिला होता. यावेळी आघाडीचे उमेदवार डॉक्टर तांबे आणि युतीचे उमेदवार प्राध्यापक सुहास फरांदे यांच्यात थेट लढत आहे. ना. स. फरांदेंचा वारसा ही प्राध्यापक फरांदेंची जमेची बाजू आहे, तर तांबेंचा जोर जनसंपर्कावर आहे. या मतदार संघात उत्तर महाराष्ट्रात 2 लाख 61 हजार मतदार आहेत.

नागपूर विभागात 82.15 टक्के मतदान

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज शांततेत मतदान झालं. विभागात 124 मतदान केंद्रावर 82.15 टक्के मतदान झालं. एकूण 36 हजार 502 मतदार आहेत. रिगणात 18 उमेदवार होते. यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ दायगव्हाणे, शिक्षक परिषदेचे नागोराव गाणार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र घाडे यांच्यात चुरस आहे. यापैकी विश्वनाथ दायगव्हाणे हे सलग तीन वेळा निवडून आले असून चौथ्यांदा ते आपलं नशिब आजमावत आहेत.

close