कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा विरोधकांची मागणी

December 2, 2010 11:47 AM0 commentsViews: 41

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

02 डिसेंबर

अवकाळी पावसानं कोकणातली 60 टक्क्याहून जास्त भातशेती मातीमोल झाली. मात्र या नुकसानीचे 40 टक्के इतकेच पंचनामे वेळेत झाले. त्यातही हेक्टरी फक्त एक हजार रुपये इतकी अत्यल्प मदतही शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

आता पुढचं वर्षभर खायचं काय अशा विवंचनेत सध्या कोकणातला बळीराजा आहे.अवकाळी पावसाने कोकणातल्या भातशेतीला असा काही तडाखा बसलाय की शेतातले उभं पीक होत्याचं नव्हतं झाले. शिवाय जनावरांची वर्षभराची वैरणही कुजून गेली. त्यातच सरकारने जाहीर केलेल्या अत्यल्प मदतीने तर शेतकर्‍यांची क्रूरचेष्टाच केली. हेक्टरी एक हजार रुपयांच्या मदतीत शेतीसाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचे असा सवालही उपस्थित होत आहे.

तुटपुंजी सरकारी मदत मिळवण्यासाठी कागदपत्रांचा खर्चही मदतीपेक्षा जास्त येतो. अशा स्थितीत शेतक-यांना तातडीने रोख रकमेच्या स्वरुपात पुरेशी मदत मिळावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. कोकणात भातशेतीच्या नुकसानीचा सरकारी आकडा अंदाजे नऊ हजार हेक्टर इतका आहे. पण अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे वेळेवर झालेलेच नाहीत. त्यामुळे भातशेतीचं 100 टक्के नुकसान गृहित धरून कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

close