रेल्वे भरती परीक्षा मराठीतून व्हावी – शिवसेनेची मागणी

October 31, 2008 3:45 PM0 commentsViews: 186

31 ऑक्टोबर, मुंबई अमेय तिरोडकररेल्वे भरती परीक्षेत परप्रांतियांविरोधात आंदोलनं होतात. पण या आंदोलनांमुळे मराठी तरुणांचं नुकसान होत असल्याची सतत ओरड होत असते. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राऐवजी इतर राज्यातून नोकरभरती होते. हेच कर्मचारी महाराष्ट्रात पाठवले जातात. आता शिवसेना 5 नोव्हेंबरपासून रेल्वेभरती परीक्षा मराठी भाषेतून व्हावी, यासाठी आंदोलन करणार आहेत. रेल्वे भरतीच्या परीक्षेसासाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांच्या विरोधात आंदोलन होतं, पण त्यातून रेल्वेत मराठी तरुणांची भरती होतच नाही. उलटमहाराष्ट्राचा कोटा उत्तर भारतातूनच भरला जातो. 2006-2007 साली महाराष्ट्रातून मोटरमन पदासाठी अवघे 78 उमेदवार रेल्वे परीक्षेत पास झाले. पण त्याचवर्षी अलाहाबादेतून मात्र 1016 उमेदवार पास झाले. यासंदर्भात शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळानं त्यावेळी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली होती. त्यांनी महाराष्ट्रासाठी 3 हजार मोटरमनची पद देण्याचं मान्य केलं, मात्र आजही ही पदं भरली जात आहेत ती उत्तर भारतातल्या केंद्रांतून. आता शिवसेनेनं याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ' आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करू. मोर्चे काढू , घेराव घालू , पण तरीही उपयोग झाला नाही, तर आम्हाला अन्य मार्गांचा वापर करावा लागेल ', असं शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांनी सांगितलं. उत्तर भारतीयांना हिंदीतून परीक्षा देता येते. दक्षिण भारतातील उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेतून पेपर लिहिण्याची परवानगी आहे. मात्र मराठी, बंगाली, पंजाबी या भाषांना रेल्वे भरतीत स्थान नाही. भाषावार प्रांतरचना घटनेनं मान्य केलीय. अशावेळेस मुंबई रेल्वे बोर्डाच्या भरतीत मराठी भाषेतून पेपर लिहिण्याची परवानगी रेल्वेनं दिली, तर मराठी तरुण पास होत नाहीत ही तक्रार दूर होईल.

close