आयपीएलच्या राजस्थान आणि पंजाब टीमचे खटले कोर्टात प्रलंबित

December 2, 2010 11:48 AM0 commentsViews: 6

02 डिसेंबर

बीसीसीआयला सलग दुसर्‍यांदा कोर्टाने दणका दिला आहे. राजस्थान रॉयल्स टीम बरखास्त करण्याच्या निर्णयाला कोर्टाने नुकतीच स्थगिती दिली होती. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब टीमविषयीचा खटला हाताळणार्‍या लवादाने या खटल्यातून माघार घेतली. आणि माघार घेताना बीसीसीआय दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लवाद श्रीकृष्णा यांनी 35 वर्षांपूर्वी पंजाब टीमचे मालक नेस वाडिया यांच्या कंपनीसाठी एक खटला लढवला होता. श्रीकृष्णा आणि वाडिया कुटुंबाची जुनी ओळख आहे. ते नि:पक्षपातीपणे निकाल देतील का असा सवाल बीसीसीआयच्या वकिलांनी केला.

बीसीसीआयच्या या आक्षेपामुळे श्रीकृष्णा यांनी खटल्यातून माघार घेतली. पण माघार घेताना त्यांनी बीसीसीआयला हे ही सुनावलं की राजस्थान रॉयल्स टीमची सुनावणी सुरु असताना वाडिया कुटुंबाशी आलेले व्यावसायिक संबंध त्यांनी उघड केले होते. मग त्या खटल्यात त्यांनी आक्षेप का घेतला नाही.

दुसरी गंमत म्हणजे श्रीकृष्णा यांनी काही वर्षांपूर्वी एका खटल्यासाठी बीसीसीआयचंही वकिलीपत्र घेतले होते. पण ही गोष्ट त्यांनी कोर्टात उघड केल्यावर पंजाब टीमने मात्र आक्षेप घेतला नाही. त्यामुळे बीसीसीआयने राजस्थान आणि पंजाब टीमच्या खटल्यात वेगवेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप होतो.

close