जैतापूर प्रकल्पाचा पर्यावरणीय अभ्यास करुनच काम करावे

December 5, 2010 1:06 PM0 commentsViews: 8

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

05 डिसेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकर्‍यांसोबत आता मच्छिमारही सरसावले आहे. त्यामुळे या प्रकल्पात न्यूक्लीअर पॉवर कॉर्पोरेशनला अनेक अडचणींना सामोर जावे लागणार आहे. कोकणातल्या प्रस्तावित औष्णिक वीज आणि मायनिंग प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास केल्याशिवाय एकाही प्रकल्पाचे काम सुरू करु नये या मागणीने आता जोर धरला आहे.

मोर्चा, निदर्शन,उपोषण, याच घटनांनी माडबन परिसर ढवळून निघाला आहे. विविध मार्गांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भुमिपुत्रांचा विरोध सुरु आहे आणि हा विरोध वाढतच जात आहे. स्थानिक शेतकर्‍यांसोबतच मच्छीमारही आता या आंदोलनात उतरले आहे. या आंदोलनाची एकत्रित ताकद माडबन गावात शनिवारी दिसली.भारत भेटीवर आलेले फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सार्कोझी यांचा निषेध करीत 2 हजार आंदोलक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली. प्रकल्पाला ना हरकत देताना निरी या संस्थेचा अपुरा अहवाल पर्यावरण मंत्रलयाने स्वीकारलाच कसा असा सवाल केला जातो.

जनहीत सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर म्हणतात की," निरीने 13 जुलै 2010 ला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चोख कबूल केलं की आम्ही 20 टक्केच EIA केलेला आहे. कारण ह्यात किरणोत्सर्गी 80 टक्के आहे. माझ्या खात्रीप्रमाणे एनपीसीआयएल ने आजपर्यंत एआईआरबीकडे अर्ज केलेला नाही. तरीही हा प्रकल्प आमच्यावर लादत आहेत.

कोकणच्या पर्यावरणावर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार न करता 10 हजार मेगावॅटच्या या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने मंजूरी कशी दिली असा प्रश्न आंदोलक नेत्यांनी केला आहे. स्थानिकांचा विरोध मोडीत काढून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे केंद्र सरकारने ठरवले. या तणावाच्या परिस्थितीत राज्य सरकारने समन्वयाची भूमिका घेण्याची गरज आहे. नाहीतर जैतापूर परिसराचे नंदीग्राम व्हायला वेळ लागणार नाही.

close