मराठी- अमराठी लोक संस्कृतीच्या नाळेनं जोडले गेलेत

November 1, 2008 8:34 AM0 commentsViews: 3

1 नोव्हेंबर, मुंबईमराठी- अमराठी वादामुळं मराठी माणसाच्या आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे. पण सहिष्णु, परोपकारी आणि पुरोगामी विचारांचा अशी मराठी माणसांची ओळख आहे. त्यामुळंच अमराठी लोकांशी त्याचं अनेक वर्षांपासून जुळलेलं नातं, या वादांमुळं तुटणार नाही, अशी खात्री अजुनही व्यक्त होत आहे.बिहारमधील पुरस्थितीच्यावेळी महाराष्ट्रातून गेलेल्या डॉक्टरांच्या पथकापैंकी पुण्यातील डॉ.मानसी पळशीकर एक होत्या. पथकात त्याच एक महिला डॉक्टर होत्या. ' सर्व पेशंटची सुख आणि दु:ख एकच असतात. महिला बाळंत झाल्यावर तो आनंद सर्वत्र एकसारखाच असतो', असं डॉ. पळशीकर सांगत होत्या. या भावना आहेत एका मराठी डॉक्टरच्या बिहारी पेशंट्सविषयी. भाषेच्या नावावर राजकारण केलं जात असलं तरी प्रांत आणि भाषेच्या पलीकडे जाऊन माणसांचा विचार करणारी आपली संस्कृती हे लोक जपतायत. याच संस्कृतीच्या नाळेनं जोडले गेलेले मराठी अमराठी लोक या छोट्या वादांमुळं एकमेकांपासून तुटणार नाहीत, असा दावा आजही केला जाताय. ' कानपूर आणि अलहाबादमध्ये कित्येक मराठी कुटुंब आहेत. प्रोफेसर आणि डॉक्टर मंडळी तिथे कार्यरत आहे. तिथल्या संस्कृतीमध्ये समरस झाली आहे ', असं प्रसिद्ध ऑर्थोपिडिक सर्जन डॉ. नंदकिशोर लाड सांगत होते. प्रांत आणि भाषेच्या नावावर राजकारण करणारे देशाचा समृद्ध इतिहास विसरल्याची खंतही व्यक्त होते. ' इतिहास निर्माण करणार्‍या व्यक्तींवर अधिपत्य गाजवलं जातंय. शिवाजी महाराजांवर महाराष्ट्राचं तर महाराजा राणा प्रताप यांच्यावर राजस्थान अधिपत्य गाजवंतय. नेत्यांना छोटं केलं जातंय' , असं ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांनी सांगितलं.मतांसाठी प्रांतीयवादाचं हत्यार उपसणार्‍यांना जनतेला काही गोष्टी कळतात, याचा विसर पडलेला दिसतोय. एका दिवसाच्या वादामुळं मराठी- मराठी माणसांमध्ये अनेक पिढ्यांपासून तयार झालेले ऋणानुबंध तुटण्याएवढे तकलादू नाहीत, हे यापूर्वीही सिद्ध झालंय आणि येत्या काळातंही सिद्ध होईल.

close