तिवारींची पदावरुन हकालपट्टी करण्याची विरोधकांची मागणी

December 9, 2010 3:02 PM0 commentsViews: 1

09 डिसेंबर

नगरविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी फक्त आदर्शच नाही तर त्याचबरोबर इतर अनेक ठिकाणीही आपल्या गैरकारभाराचे ठसे उमटवले. शहरांमध्ये नगररचना कायद्यांत बिल्डरांच्या हिताच्या ज्या सुधारणा झाल्या, त्यामागचं ब्रेनही रामानंद तिवारी यांचंच आहे. आणि त्यामधून त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी फ्लॅट्स आणि जमिनींच्या माध्यमातून मोठी माया जमवल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. त्याचबरोबर फक्त मुंबई आणि नवी मुंबईतच नाही, तर रायगड जिल्ह्यातही तिवारींनी त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. रामानंद तिवारी सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी इतका भ्रष्ट कारभार केलेला असतानासुद्धा सरकारनं त्यांची माहिती आयुक्तपदी नियुक्ती केली. या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी आता विरोधकांनी केली आहे.

भ्रष्टाचार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे -अण्णा हजारे

रामानंद तिवारी यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. भ्रष्टाचार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली. माहिती आयुक्तच भ्रष्टाचारी असतील तर सामान्य लोकांचे काय होणार असा सवालही अण्णांनी केला.

close