ऊसाला हप्ता 2200 रुपये द्यावा !

December 12, 2010 2:11 PM0 commentsViews: 6

12 डिसेंबर

राज्यभरात आजचा दिवस हा आंदोलनाचा होता. ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन 2200 रुपये द्यावा. या मागणीसाठी आज राज्यभरात शेतकरी संघटना, शेतकरी कृती समिती आणि मनसेने रास्तारोको आंदोलन केले. नाशिक, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये हे आंदोलन झाले. आज कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या संघटनांनी आज आपलं आंदोलन केलं.

पुण्यात कारखान्याकडून दीड हजाराची उचल

उसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी कृति समिती आणि शेतकरी संघटनेनं नीरा शहरात रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकरी संघटनेने 2200 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळत कारखान्याने दीड हजार रुपये उचल जाहीर केली. त्यामुळे शेतकरी कृति समिती आणि शेतकरी संघटनेने आंदोलन केले. आंदोलकांना पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने अडवले. आणि चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात येईल असं निवेदनही यावेळी पोलिसांनी स्विकारलं. आंदोलकांच्या मागण्या शासनाकडे सादर करण्याचंही आश्वासन पोलिस प्रशासनानं दिलं आहे.

नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको

नाशिक – पुणे महामार्गावर शेतकरी संघटनेने आज (रवीवारी) रास्ता रोको आंदोलन केले. ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन 2200 रुपये द्यावा. ऊस तोडणी मजुंराना प्रतिटन 200 रु. मजुरी मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे महामार्गवरील वाहतुक ठप्प झाली होती. या मागण्या मान्य झाल्या नाहीतर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला.

पुणे- सोलापूर हैदराबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प

सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊस दर प्रश्नावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी संघटनेच्यावतीने हायवेवर आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे काही काळ पुणे – सोलापूर हैदराबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सोलापूर जिल्ह्यातला बहुतेक ऊस लगतच्या सांगली जिल्ह्यात जातो. तिथे उतार चांगला मिळतो. मात्र सोलापूर जिल्हयातले साखर सम्राट उतार कमी दाखवून भाव कमी दाखवम्याच्या प्रयत्न करतात अशी तक्रार इथले शेतकरी करत आहे. त्यातच आज शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या संघटनांनी आज आपलं आंदोलन केलं. येत्या दोन दिवसात उसाला 2200 रुपये इतका भाव न दिल्यास कारखान्यांचे चेअरमन आणि प्रमुख पदाधिकारी यांना जिल्हयात फिरु न देण्याचा इशारा मनसेने दिला.

तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने आज विविध ठिकाणी रास्ता रोको आदोलन केलं. शिरूर तालुक्यातील घोडगंगा आणि जुन्नर तालुक्यातील विघ्नहर कारखाना परिसरात जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलकांनी कारखान्यांच्या विरोधात भावना प्रकट केल्या. पुणे-नाशिक आणि कल्याण-अहमदनगर महामार्गावरील आळेफाटा चौकात एक तास भर महामार्ग रोखून धरण्यात आला. यात पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. 140 कलम भंगाबद्दल कोणावरही गुन्हा दाखल नाही.

close