अर्थमंत्र्यांनी फटकारल्यानंतर आसोचेमकडून नोकरकपातीचा अहवाल मागे

November 1, 2008 9:07 AM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, दिल्लीआसिफ मुरसलअर्थमंत्र्यांनी फटकारल्यानंतर असोचेमनं देशातल्या नोकर्‍यांबाबतचा त्यांचा रिपोर्ट मागे घेतला आहे. कॉस्ट कटिंग करण्यासाठी अनेक बड्या आयटी, बँकिंग आणि बीपीओ सेक्टरमधल्या कंपन्या कर्मचार्‍यांची कपात करणार आहेत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. या रिपोर्टवर फिक्कीनंही तीव्र टीका केली होती. अर्थव्यवस्थेत येणार्‍या अडचणींमुळे येत्या दहा दिवसात सुमारे सात क्षेत्रातल्या 25 टक्क्यांहून अधिक लोकांच्या नोकर्‍या जाऊ शकतात, असा रिपोर्ट असोचेम म्हणजे ' असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडियानं ' दिला होता. या अहवालानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाल्यानं अर्थमंत्र्यांना हस्तेक्षेप करावा लागला.' अर्थव्यवस्थेची प्रगती नऊ टक्क्यांनी असताना नोकर्‍यांचं प्रमाण वाढेल, पण हीच प्रगती जर सात टक्क्यांनी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल, पण प्रगतीचा वेग मंदावला म्हणजे नोकर्‍याच जातीलच, असं नाही. म्हणूनच माझे सहकारी आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी असोचेमच्या रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. ' अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे.तज्ज्ञांच्या मते ' अमेक्स, क्रायस्लर, मोटोरोला अशा काही बहुराष्ट्रीय कंपन्या जरी नोकर्‍यांमध्ये कपात करत असल्या, तरी भारतात याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. कॉस्ट कटिंग करण्याचे इतरही मार्ग उपलब्ध आहेत. बोनस कमी करणं, कमी इन्सेन्टीव्ह आणि कमी पगारवाढ, तसंच व्यवस्थापकीय क्षेत्रात मोठ्या आणि मध्यम दर्जाच्या पदांसाठी सवलती कमी करणं असे पर्यायही अवलंबता येऊ शकतात. 'आपला रिपोर्ट रिअल इस्टेट, ब्रोकरेज आणि गुंतवणूक सल्लागार क्षेत्रातल्या प्राथमिक निष्कर्षांवर आधारित होता असं असोचेमचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शिक्षण, बायो टेक्नॉलॉजी आणि आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढतील, असंही असोचेमनं म्हंटलंय. आता सीआयआयनं असोचेमच्या रिपोर्टला आव्हान देण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

close