जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा द्या -मुख्यमंत्री

December 13, 2010 2:52 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण खात्याची परवानगी मिळण्याअगोदर पासून स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करीत आहे. तर दूसरीकडे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुर्णवसन झाल्यानंतर पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. तर आज या प्रकरणावर पडदा टाकत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाला पाठिंबा द्या असं आवाहन अधिवेशनात केलं.

अरेवा कंपनी नाही तर एनपीसीआयएल अणुभट्टी उभारणार आहे. राज्यात मोठे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी जागा नाही अणु ऊर्जा ही सर्वात स्वच्छ ऊर्जा मोठ्या भट्टया उभारण्याचे तंत्रज्ञान भारताकडे नाही त्यामुळे परदेशी तंत्रज्ञान घ्यावं लागतं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज(सोमवारी) विधिमंडळ अधिवेशनात दिले. आज अधिवेशनात जैतापूर प्रकल्पाबाबत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

एन्रॉन आपण बुडवायला निघालो होतो काय झालं त्याचं? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळेल याची काळजी घेऊ असंही चव्हाण यांनी सांगितले. तसेच जैतापूर प्रकल्पाचा मासेमारीवर परिणाम होणार नाही देशातल्या इतर भागात जे प्रकल्प आहेत तिथं मच्छिमारी होते त्याठिकाणी कुठला परिणाम दिसला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

याआधी जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल असं माधव गाडगीळ समितीच्या अहवालात म्हटले आहे. तरीही हा प्रकल्प का रेटला जातोय, असा सवाल शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सरकारला विचारला. जैतापूरमधल्या अणुभट्टीला युरेनियम पुरवणारी अरेवा कंपनी नियमांचे काटेकोर पालन करत नाही असं वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राने लिहिलं. अणुभट्टीतून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढेल आणि मासेमारी संपून जाईल, असं सुभाष देसाई म्हणाले.

close