पुण्यात भूखंड घोटाळा ; लष्करावर आरोप

December 13, 2010 4:06 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

भूखंड घोटाळे काही महाराष्ट्राची पाठ सोडत नाही. तर पुण्यात आणखीन एक जमीन घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. आणि यावेळी त्यात लष्कराचा सहभाग आहे. लोहगावमधल्या 69 एकर जमिनीवर लष्कराने दावा सांगितला आहे. त्याच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेकडून पावणे पाच कोटी रुपयेही वसूल केले आहेत. पण आयबीएन नेटवर्कच्या हाती असलेल्या कागदपत्रांनुसार ही जागा लष्कराच्या मालकीची असल्याचा एकही पुरावा नाही. मग पुणे महानगरपालिकेने एवढी मोठी रक्कम लष्कराला का दिली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सर्व्हे नंबर 233 ए नावाने ओळखला जाणारा 69 एकरचा भूखंड. पुण्यातल्या लोहगावमधल्या लष्कराच्या कँटॉन्मेंटला लागून आहे. लष्कराचा दावा आहे की ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. तर याबद्दल स्थानिकाचं म्हणणं आहे की यावर त्यांच्या वडिलांची मालकी आहे. या वादाचा जन्म 2008 मध्ये झाला. पुण्यात त्यावेळी होऊ घातलेल्या कॉमनवेल्थ यूथ खेळांसाठी विमानतळापासून रस्ता बांधताना या जमिनीचा काही भाग वापरला जाणार होता. हायवे बांधला जात असल्यामुळे या जमिनीचा भाव चांगलाच वधारला. तेव्हा संरक्षण मंत्रालयाने या जागेवर दावा सांगितला आणि मोबदल्याची मागणी केली.

आयबीएन नेटवर्कच्या हाती असलेल्या कागदपत्रं दाखवतात की पुणे महानगरपालिकेने जागेच्या मालकीची कुठलीही चौकशी न करता. तातडीने 4 कोटी 45 लाख रुपये लष्कराकडे जमा केले. या जागेवर लष्कराने आता दावा सांगितला असला. तरी इतकी वर्षं त्यांनी हा दावा कधीही केला नव्हता. त्याचे सविस्तर पुरावे आमच्याकडे आहेत.

19 नोव्हेंबर 2007 बोर्ड ऑफ ऑफिसर्सने केलेल्या शिफारशीत स्पष्टपणे लिहिण्यात आलं की ही जमीन लष्कराची नसून हस्तांतरणाचे किंवा मालकीचे कुठलेही कागदपत्रं अस्तित्वात नाहीत.

29 नोव्हेंबर 2007 सदन कमांडचे कार्यालय पुन्हा एकदा ही जमीन लष्कराची नसल्याची भूमिका मांडतं. या भूखंडाचा उल्लेख मिलिटरी लँड रजिस्टरमध्ये सुद्धा आढळत नाही.

4 मार्च 2008डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर स्थानिक तहसिलदारांना लेखी स्वरूपात कळवतात की हा भूखंड लष्कराचा असल्याचा एकही पुरावा नाही

यानंतर तीनच दिवसांत लष्कर अचानक घूमजाव करतं. आणि जमिनीवर दावा सांगते.

7 मार्च 2008

पुण्यातले डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर दिल्लीतल्या लँड सेक्शनला पत्र लिहितात आणि कळवतात की लोहगावमधला भूखंड संरक्षण खात्याच्या मालकीचा नसला तरीही या जमिनीची अंदाजे किंमत काढण्यासाठी एक कॅलक्युलेशन शीट तयार करण्यात येते. ही कॅलक्युलेशन शीट आयबीएन नेटवर्कच्या हाती आहे. मालक कोण हे ठाऊक नसतानाही बाजार भावानुसार या जागेची किंमत 4 कोटी 45 लाख रुपये असल्याचं यात लिहिण्यात आलं आहे. ही रक्कम लष्कराकडे जमा करण्यात आली.

मग प्रश्न उपस्थित राहतो. की जर ही जमीन लष्कराची नाही तर मग त्यांना ही रक्कम का देण्यात आली? या भूखंडावर दावा करणा-या स्थानिकाचं म्हणणं आहे की लष्कराने त्यांच्या जमिनीवर घुसखोरी केली असून गैरमार्गाने रक्कम मिळवली.

close