लाडक्या लक्ष्याचा सहावा स्मृतीदिन

December 16, 2010 2:23 PM0 commentsViews: 19

तुषार बोडखे,मुंबई

16 डिसेंबर

कोटीबाज विनोद आणि हजरजबाबीपणा ही लक्ष्मीकांत बेर्डे या उमद्या अभिनेत्याची खासियत याच गुणावर त्याने दोन दशक मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रसिकांच्या लाडक्या लक्ष्याचा आज सहावा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीला दिलेला उजाळा.

ऐंशीच्या दशकात मराठी सिनेमांनी सुगीचे दिवस अनुभवले. व्यावसायिक पठडीत दर्जेदार सिनेमे देणार्‍या अभिनेत्यांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आघाडीवर होता. पण त्याचा प्रवास सहजसोपा झाला नव्हता. टूरटूर आणि बिघडले स्वर्गाचे दार या नाटकांमुळे लक्ष्मीकांत नावारुपास आला.आणि धुमधडाका या सिनेमाच्या सिल्व्हर ज्युबिली यशामुळे रातोरात स्टार झाला. त्यानंतर सुरु झाला लक्ष्या नावाचा रुपेरी झंझावात. दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, झपाटलेला, धडाकेबाज, चिकट नवरा, चंगू मंगू अशा अनेक सुपरहिट सिनेमांची रांगच लागली.अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत या जोडगोळीने दशक गाजवले.

घवघवीत यशामुळे लक्ष्याच्या नावाला ग्लॅमर आलं. आणि त्याने मराठी इंडस्ट्रीत खर्‍या अर्थाने व्यावसायिकता रुजवली. त्यामुळे त्याला मराठीतला पहिला सुपरस्टार म्हंटलं जातं. पण विनोदी सिनेमांच्या चलतीमुळे लक्ष्या इमेजमध्ये अडकत गेला. हाच सूनबाईचा भाऊ, एक होता विदूषक, माणूस अशा मोजक्याच सिनेमात त्याच्या बहुआयामी भूमिका होत्या. पण गल्लाभरु विनोदी सिनेमांमुळे त्याच्यातला प्रगल्भ अभिनेता दुर्लक्षित राहिला.मात्र प्रचंड लोकप्रियता त्याच्या वाट्याला आली.

आयुष्याच्या सन्मानसंध्या न स्वीकारता लक्ष्या अचानक गेला. त्याचे जाणं रसिकांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरलं. पण त्याच्या सदाबहार भूमिका रसिकांच्या मनात कायम रुंजी घालतात.

close