शेतकरी सभासद अंधारात बिल्डर मात्र उजेडात

December 17, 2010 12:18 PM0 commentsViews: 2

संजय वरकड, औरंगाबाद

17 डिसेंबर

औरंगाबाद जिल्ह्यातल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याची जागा कवडीमोल भावात विकण्याचा घाट घातला जातोय. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारखान्याच्या या निर्णयाला स्थगिती दिली. पण तरीही कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून कारखान्याने जमीन एका बिल्डरच्या नावे करून दिली. याला सभासद शेतकरी आणि संचालक मंडळाकडून तीव्र विरोध होता.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 152 एकर जागा कारखान्याने विक्रीला काढली. हा निर्णय कोणतीही जाहिरात न देता, सभासद शेतकर्‍यांचे मत जाणून न घेता घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे तारण असलेली ही जागा विकायला सभासद शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे.

सर्व नियम पायदळी तुडवून या जमिनीचा विक्री व्यवहार केला जातोय. बाजारभावानुसार सुमारे पन्नास कोटी रूपयांची ही जागा अवघ्या अठरा कोटीत विक्री करण्याच्या देवगिरी कारखान्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठान स्थगिती दिली. मात्र न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून कारखान्याने रजिस्ट्री न करताच जमिनीचा बांधकाम व्यावसायिक सुभाष झांबड यांना देण्यात आला.

कारखान्याच्या या जागेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. पण अजित पवार यांचे नाव पुढे करून सुभाष झांबड यांनी त्यात बाजी मारली. प्रत्यक्षात अजित पवार यांच्या अन्य काही निकटवर्तीयांनी ही जमीन कवडीमोल भावाने विकायला विरोध आहे. देवगिरी सहकारी साखर कारखान्यासाठी गोरगरीब शेतकर्‍यांनी दिलेली ही जमीन राजकीय दबावातून बिल्डराच्या घशात जाईल अशी शक्यता वाढली आहे.

close