नाशिकमध्ये शिवसेना महानगरप्रमुखांचा पुतळा शिवसैनिकांनीच जाळला

December 17, 2010 12:37 PM0 commentsViews: 10

17 डिसेंबर

नाशिकमध्ये शिवसेनेतल्या गटबाजीने हिंसक वळण घेतले आहे. महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि गटनेते अशोक गवळी यांचे पुतळे शिवसैनिकांनीच जाळले. या आधी संपर्कप्रमुख संजय राऊत यांचा पुतळा शिवसैनिकांनी नाशिकमध्ये जाळला होता. आता त्यांनी नियुक्त केलेल्या महानगरप्रमुखांचाही पुतळा जाळण्यात आला. सेनेतल्या या गटबाजीची चौकशी करण्यासाठी अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर आणि नेरुरकर हे पक्षाचे नेते नाशिकमध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार झाल्याने सेनेतला राडा आता जास्त तीव्र झाला आहे.

दोन दिवसांअगोदर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये थेट महानगरपालिकेच्या सभागृहातच बाचाबाची झाली होती. सभागृहाच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी थेट सेनेच्या महानगरप्रमुखांना सभागृहातच शिवीगाळ केली. तर बडगुजर आणि बोरस्ते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृहाबाहेर जुपली. इतकंच नाही, तर वॉर्डातल्या कामांच्या वादावरून सेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी सेनेचे तानाजी फडोळ यांच्यावर चक्क पाण्याचा ग्लास फेकला होता. शिवसेनेतल्या अंतर्गत कलहामुळे सेनेच्या महापौरांवर शेवटी सभा तहकूब करण्याची नामुष्की आली.

close