तर साहित्य संमेलनच होऊ देणार नाही संभाजी ब्रिगेडचा इशारा

December 17, 2010 3:03 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा वाद अजूनही संपत नाही. आता संभाजी ब्रिगेडने साहित्य संमेलन होणार्‍या दादोजी कोंडदेव स्टेडिअमचे नावं बदलण्याची मागणी केली आहे. साहित्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये होणार आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. त्यामुळे नावं बदलण्यात यावं अन्यथा साहित्य संमेलनच होऊ देणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे. दरम्यान नाव बदलण्याचा निर्णय हा संपूर्णपणे ठाणे महानगरपालिकेचा आहे.

ठाण्यात होणार्‍या 84 वं साहित्य संमेलनांचे पडघम आता वाजू लागले असले तरी या संमेलनावर राजकीय वादांचे संकट अधिक गहिरं होत चाललं आहे. महानगरपालिकेने संमेलनाच्या मंडपाचे काम टेंडर न उघडताच सुरू केल्याने विरोधकांनी ते काम बंद पाडलं, तर आता दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी सारस्वतांनी एकत्र येऊन साहित्यावर मराठीच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठीचं एक व्यासपीठ. पण गेल्या काही वर्षात साहित्यापेक्षा संमेलनाचा खर्च आणि त्यानंतरचे आरोप-प्रत्यारोप यामुळेच संमेलन गाजत आहेत. आणि ठाण्यातील साहित्य संमेलनावरही आता राजकीय वादाचं सावट पसरलं आहे. महानगरपालिकेने टेंडर न उघडता दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये संमेलनाच्या मंडपाचे काम सुरू केल्याचा आरोप करत विरोधकांनी हे कामच बंद पाडलं.

हे संकट आलं असतानाच आता संमेलनाच्या आयोजकांपुढे दुसरे मोठे संकट उभं राहिलं ते म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या धमकीचं. संभाजी ब्रिगेडने महानगरपालिकेकडे दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलण्याची मागणी केली नाहीतर साहित्य संमेलन होऊ देणार नाही असा इशाराही दिला.या संपूर्ण वादामुळे आयोजक धास्तावलेले असले तरी महानगरपालिकेने यावर तातडीने उपाय काढण्याची त्यांना अपेक्षा आहे.

close