कट्टरतावाद आणि दहशतवाद देशाला घातकच – सोनिया गांधी

December 19, 2010 10:24 AM0 commentsViews: 7

19 डिसेंबर

देशातले बहुसंख्याक असो वा अल्पसंख्याक कुणीही पसरवत असलेला कट्टरतावाद आणि दहशतवाद देशाला घातकच आहे. धर्मभेद आणि सांप्रदायिकता यामुळे देशाचे मोठे नुकसान होते असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आज सुरुवात झाली. या अधिवेशात काँग्रेस पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी पक्षाच्या उणिवांवरही बोट ठेवले. त्याचबरोबर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या भाजपने कर्नाटकातल्या भ्रष्टाचाराकडे दूर्लक्ष का केलं असा सवालही सोनियांनी विचारला.

पक्षाकडे मोठा समृध्द वारसा आहे. हा वारसा जपण्याबरोबरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे तसेच पक्षाला निवडणूक लढवण्याखेरीज अजून काही करायचे आहे असं सोनिया म्हणाल्या. त्याचबरोबर संसद हे मुद्यांवर चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे, पक्षांना भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी नवीन यंत्रणा तयार करण्याची गरज आहे . ही यंत्रणा अधिक पारदर्शी असावी, सरकारी कार्यपध्दती कोणत्याही स्थितीत मॅनेज केली जावू नये असंही आवाहन त्यांनी केले. लग्न आणि समारंभ साधेपणाने साजरे केले जाऊ शकतात नैतिकतेच्या दृष्टीने जास्त पैसा उधळणं चुकीचे आहे अशा सूचनाही त्यांनी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

close