अश्लील एसएमएस पाठवणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला महिलाने कानफटात लगावली

December 20, 2010 10:39 AM0 commentsViews: 6

20 डिसेंबरमहिला पोलिस शिपायाला मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठविणार्‍या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला आज पहाटे पहाटे श्रीमुखात खाण्याची वेळ आली. मोबाईलवर पाठविलेल्या एसएमएसमुळे संतप्त झालेल्या या महिला पोलिसाने तिच्या पतिसोबत येऊन या फौजदाराला जाब विचारला तेव्हा त्याची चांगलीच त्रेधा-तिरपट उडाली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या पोलीस मुख्यालयात हा प्रकार घडला. औरंगाबाद पोलीसातील सुनील दीक्षित नावाच्या या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या सहकारी महिलेला अश्लील एसएमएस पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्याच अंगलट आला. ही महिला पोलिस दीक्षित यांच्यासोबत ड्यूटीवर असतानाच त्यांनी तिला एक दोन नव्हे तर चार वेळा एसएमएस पाठवून भंडावुन सोडलं. अखेर तिने याबाबत तिच्या पतीली ही माहिती दिली. आज पहाटे सुनील दीक्षित कामावर हजर झाले तेव्हा या महिला शिपायाने वरिष्ठ अधिकार्‍यासमोरच हा एसएमएस वाचून दाखविला. त्यानंतर दीक्षित सारवासारव करू लागले तशी या महिलेने संतापाने सरळ त्यांच्या कानफटात लगावली. त्यामुळे तिथे चांगलाच गोंधळ उडाला. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातल्या अनेक महिला पोलिसांच्या त्यांच्या वरिष्ठांविषयी तक्रारी आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नाही. याप्रकारामुळे तरी पोलिस आयुक्त कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे.

close