शाळा चालवली म्हणुन तुरुंगवास

December 20, 2010 4:31 PM0 commentsViews: 8

प्रताप नाईक, कोल्हापूर

20 डिसेंबर

2006 पासून राज्य सरकारने मराठी शाळांना मान्यता देणं थांबवलं आहे. एकीकडे मान्यता द्यायच्या नाहीत आणि दुसरीकडे मान्यता नसलेली शाळा चालवली तर फौजदारी कारवाई करायची असं दुटप्पी धोरणं सरकार मराठी शाळांबाबत चालवतं. कोल्हापूर जिल्ह्यातील वळिवडे गावात मराठी शाळा चालवल्याची किंमत आहे ती तुरुंगवासाची. इथल्या मराठी शाळेच्या शिक्षण संस्थापकाला सात दिवस तुरुंगवास भोगावा लागला आहे.

9 हजार लोकांची वस्ती असलेल्या वळिवडे गावात जिल्हा परिषदेची फक्त एकच प्राथमिक शाळा आहे. म्हणून ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेऊन राजगोंडा वळिवडे यांनी 2006 साली श्री राजर्षी छत्रपती शाहु बालसंस्कार केंद्र ही तिसरीपर्यंतची मराठी शाळा सुरु केली. 2008 मध्ये त्यांनी शासनाकडे शाळा मंजुरीसाठी प्रस्तावही पाठवला. पण मंजुरी राहिली बाजूला त्यांच्या वाटेला फौजदारी गुन्हा आला. तो सुद्धा गटशिक्षणाधिकार्‍यांनीच दाखल केला. आणि गांधीनगर पोलिसांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

तुरुंगात डांबलात तरी मराठी शाळा बंद करणार नाही असा निर्धार राजगोंडा यांनी अधिकच पक्का केला. आणि शाळेवर फौजदारी कारवाई होवुनही पटसंख्या कमी झालेली नाही. अनेक शाळा कागदावर सुरु आहेत. मग अशा शाळांवर कारवाई का असा प्रश्न विचारला जात आहे.

close