काँग्रेसच्या 83 व्या महाधिवेशनाचा समारोप

December 20, 2010 5:02 PM0 commentsViews: 5

20 डिसेंबर

काँग्रेस पक्षाला 125 वर्षं पूर्ण होत असताना आयोजित केलेल्या 83 व्या महाधिवेशनाचा आज समारोप झाला. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अतिशय आक्रमक भाषण केलं. 2जी घोटाळ्यात लपवण्यासारखं माझ्याकडे काही नसल्यामुळे मी संसदेच्या लोकलेखा समितीसमोर हजर राहण्यास तयार आहे असं म्हणाले. पण जेपीसीच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधकांचे मात्र पंतप्रधांनाच्या ऑफरने समाधान झालं नाही.

सोनिया गांधी पाठीशी असताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आक्रमक शैलीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. आपण संसदेच्या पीएसी म्हणजेच लोकलेखा समितीला सामोर जायला तयार आहोत. मग जेपीसीची गरज काय असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. 2जी स्पेक्ट्रम घोटाळा पंतप्रधानांच्या निष्क्रियतेमुळे झाला. असा ठपका विरोधकांनी ठेवला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले. की मी कुणालाही वाचवत नसून दोषी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा केली जाईल.

पण पीएसी समोर हजर राहण्याच्या पंतप्रधानांच्या ऑफरने विरोधक समाधानी नाही. जर लपवण्यासारखं काहीच नाही तर पंतप्रधान जेपीसी चौकशीची मागणी मान्य का करत नाहीय असं भाजपने विचारलं आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून येत्या बुधवारी भाजप देशभर महासंग्राम आंदोलन पुकारणार आहे. 125 वर्षांपूर्वी काँग्रेसला ब्रिटिशांच्या भ्रष्ट धोरणांशी मुकाबला करावा लागत होता. आता या पक्षाला आपल्याच लोकांच्या भ्रष्ट वागणुकीशी दोन हात करावे लागत आहेत.

close