भारत आणि रशियात 30 महत्त्वपूर्ण करार

December 21, 2010 5:12 PM0 commentsViews: 4

21 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रशियाचे अध्यक्ष द्मित्री मेदवेदेव यांच्यात आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली. भारत आणि रशियामध्ये 30 करारांवर सह्याझाल्या. मेदवेदेव यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर कडक भूमिका घेतली. दुसरीकडे भारत आणि रशियाची मैत्री अभेद्य असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य असलेल्या सर्वच्या सर्व 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी या एकाच वर्षात भारताला भेट दिली. त्यापैकी रशियाचे अध्यक्ष द्मित्री मेदवेदेव हे पाचवे राष्ट्रप्रमुख आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि द्मित्री मेदवेदेव यांच्या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध बळकट करण्यावर एकमत झाले. मेदवेदेव यांनी यावेळी पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादावर कडक भूमिका घेतली. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं की, मुंबई हल्ल्यातल्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघेही गुन्हेगार आहेत.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातल्या अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या स्थैर्याला धोका निर्माण केला आहे.

यावेळी 30 करारांवर स्वाक्षर्‍याही करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मिसाईल आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टनंतर आता दोन्ही देश संयुक्तपणे फायटर विमान तयार करणार आहेत. तर रशियानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतल्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे.याबरोबरचं अणुपुरवठादार देशांच्या गटात भारताच्या समावेशालाही रशियाने पाठिंबा दिला. पण अणुसहकार्याच्या मुद्द्यावर मात्र फारशी प्रगती झाली नाही. अणुकरसहकार्यातल्या काही मुद्द्यांवर रशिया साशंक आहे. पण दहशतवाद आणि सुरक्षा परिषदेसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भारताच्या बाजूने भूमिका घेऊन मेदवेदेव यांनी द्विपक्षीय संबंधांतल्या पुढच्या अध्यायाला सुरुवात केली.

close