शाळा संस्थाचालकांना फौजदारी कारवाईची धमकी

December 22, 2010 2:42 PM0 commentsViews: 9

शेख मुजीब, परभणी

22 डिसेंबर

ग्रामीण भागात जिथे विद्यार्थ्यांची संख्या शाळांमध्ये भरपूर आहे. जिथे संस्थाचालक चांगल्या पद्धतीने शाळा चालवतात त्यांना मान्यता देण्याऐवजी सरकारने संस्थाचालकांना तुरुंगात डांबण्याची मोहीम सुरु केली आहे. परभणीतील कानेगाव इथे अशाच पद्धतीने शिक्षणाधिकार्‍यांनी एका संस्थाचालकावर फौजदारी कारवाई करण्याची धमकी दिल्याने सरकारचा दुटप्पी कारभार समोर आला आहे. पोलीस आणि शिक्षण विभागाचे अधिकारी सुरेश इखे यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देतायत कारण आहे. ते मराठी शाळा चालवतात….!

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कानेगावची लोकवस्ती आहे 4000ची. पण गेली 25 वर्ष या गावात मराठी माध्यमिक शाळा नव्हती. गावातल्या मुलांना 5 किलोमीटरवर खडका गावात शाळेसाठी जावे लागते. पावसाळ्यात रस्ता नसल्यामुळे चार महिने विद्यार्थांना शाळेला जाता येत नसतं. विद्यार्थ्यांचे हे कष्ट कमी करण्यासाठी ओम बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ या संस्थेने कानेगाव इथं जून 2010 मध्ये माध्यमिक शाळा सुरु केली. 26 मुलांनी शाळेत प्रवेशही घेतला. मग शिक्षण विभागाला जाग आली.आणि ही शाळा बंद करण्याची नोटीस त्यांनी शाळेला बजावली.

गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा आटापिटा शिक्षण विभागाला कधी दिसलीच नाही. मान्यता नसल्याच्या नावाखाली एक चांगली मराठी शाळा बंद करण्याचा घाट मात्र त्यांनी घातला. गावातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन गावात मराठी माध्यमिक शाळा सुरु केली त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी ती शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागाकडून दबाव टाकला जात आहे. कानेगावातील विद्यार्थी व पालकांमध्ये याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

close