मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत पक्षप्रमुखांचा सक्रिय सहभाग

December 24, 2010 3:11 PM0 commentsViews: 5

24 डिसेंबर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूका येत्या 26 तारखेला होऊ घातल्या आहेत. आतापर्यंत या निवडणूकात विविध विद्यार्थी संघटना आपले बळ आजमावत होत्या. पण यंदाच्या निवडणूका थोड्या वेगळ्या होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण या निवडणूकीत शिवसेना आणि मनसे या पक्षांचे पक्षप्रमुखच रस घेत आहेत.

साधारण दोन- एक हजार कोटींचं बजेट असणारं हे मुंबई विद्यापीठ. या निधीच्या वापराबाबतचे सल्ले, अभ्यासक्रमातले बदल, विद्यापीठाबाबतचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार 'विद्यापीठाची विधानसभा' म्हटल्या जाणार्‍या सिनेटला असतो. त्यामुळे त्यावर वर्चस्व राखण्यासाठी अनेक पक्षांच्या विद्यार्थी संघटना प्रयत्नशील असतात. आतापर्यंत पोराटोरांच्या असलेल्या या निवडणूकीला यंदा अचानक महत्व प्राप्त झालं. कारण यंदाच्या सिनेट निवडणूकीला उद्धव ठाकरे विरूद्ध राज ठाकरे असं संघर्षाचे स्वरूप आले आहे.

दहा जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत यंदा शिवसेनेची भाविसे, काँग्रेसची एनएसयुआय, मनसेची मनविसे, भाजपची अभाविप आणि स्वाभिमान संघटनाही सर्वशक्तीनिशी उतरल्या आहेत. आतापर्यंत सिनेटवर एनएसयुआय आणि थोड्याफार प्रमाणात भविसेचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांच्यातच थेट लढत व्हायची, पण या निवडणूकीत पहिल्यांदाच भाग घेत मनविसेने ही निवडणुक चुरशीची केली.

close