आदर्शला ‘सुरुंग’ विलासरावांनी लावला !

December 24, 2010 4:11 PM0 commentsViews: 44

24 डिसेंबर

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आदेशामुळेच आदर्श सोसायटीला कारगिलच्या नावावर भूखंड मिळाला. त्यामुळे विलासरावांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. माहितीच्या अधिकारात नव्याने मिळालेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून विलासराव देशमुख यांच्याच स्वाक्षरीच्या आदेशामुळे आदर्शचा घोटाळा सुरू झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आदर्श सोसायटी ही कारगील युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांची आहे, त्यामुळे या सोसायटीला जागा द्यावी, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना दिल्याचे कागदपत्रांतून सिद्ध होत आहे. तसेच विलासरावांनी आपल्या हस्ताक्षरात हे आदेश देऊन त्यावर सही केली आहे. त्यामुळे विलासरावांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. आदर्श सोसायटी प्रकरणी महसूल विभाग, नगर विकास खाते आणि संरक्षण खात्याकडून मिळालेल्या माहितीत तफावत असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने सध्या आदर्श प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असल्याने माहिती देता येणार नसल्याचे सांगितले.

तर दुसरीकडे नगर विकास खात्याने आदर्शसंदर्भात 1236 कागदपत्र माहितीच्या अधिकारात सोमय्या यांना दिली. तसेच संरक्षण खात्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरून तत्कालीन माजी आमदार कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अनेकवेळा निवेदनं दिली. त्यामध्ये या जागेवरच्या सोसायटीमध्ये कारगिलशी संबंधित अधिकार्‍यांना आणि शहिदांच्या नातेवाईकांना फ्लॅटस् दिली जातील असं नमूद केल आहे. त्यानंतर विलासराव देशमुखांनी आदर्शच्या भूखंडाचे आदेश काढले हे सिद्ध होत आहे. तसेच आदर्शची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात होती हे ही कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे असं किरिट सोमय्या यांचं म्हणणं आहे.

close