संमेलन आयोजकांनी मागितली माफी

December 25, 2010 9:53 AM0 commentsViews: 19

25 डिसेंबर

नथुराम गोडसेचं समर्थन करणार्‍या आयोजक नरेंद्र पाठक यांनी पलटी मारली आहे. माफी मागून स्मरणिका परत घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आयबीएन-लोकमतने ही बाब उघडकीला आणल्यानंतर साहित्यवर्तुळातच खळबळ माजली. आणि स्मरणिका मागे घेण्यासाठी सर्वस्तरीय दबाव वाढला. त्यानंतर आयोजकांनी माघार घेतली आहे. नथुराम गोडसे यांचं स्मरणिकेत नाव घालायला आयोजक नरेंद्र पाठक यांनी समर्थन केले होते.

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आले आहे. याचा खुलासा होताच अनेक मान्यवरांनी याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला . सर्व स्मरणिका मागे घेण्यात आल्या आहे. स्मरणिका परत नव्याने छापण्यात येणार आहे असे संमेलन आयोजक नरेंद्र पाठक यांनी सांगितले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्मरणिका जाळून निषेध व्यक्त केला. ही स्मरणिका तातडीनं मागे घेण्यात यावी अशी मागणीही आव्हाडांनी केली.

उत्तम कांबळे यांनी मौन पाळलं ?

"उत्तम कांबळे हे गेली 25 वर्षांपासून अधिक काळ सामाजिक कार्यामध्ये चळवळींमध्ये कार्यरत आहे. मी वादांना घाबरत नाही. मी वादांपासून दूर पळत नाही. मी वादांचे स्वागत करतो. आणि मी भूमिका घेणारा साहित्यिक आहे. पण मी प्रतिक्रियावादी नाही" अशी भूमिका आज सकाळच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सकाळी उत्तम कांबळे यांनी मांडली होती. पण प्रत्यक्षात आज नथुराम गोडसे वादावर ऊत्तम कांबळे यांनी मौन पाळलं आहे. याबाबत स्मरणिकेच्या समितीला प्रश्न विचारा असता, 'मला नको' असं उत्तर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं. खरं तर उत्तम कांबळे यांच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त होत आहे. अध्यक्ष म्हणून त्यांनी ठोस भूमिका मांडावी अशी सर्व लोकशाहीवाद्यांची मागणी आहे.

close