राहुल द्रविडचा 200 कॅच घेण्याचा रेकॉर्ड ; भारताची 166 रन्सची आघाडी

December 27, 2010 1:12 PM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. टेस्टच्या आजच्या दुसर्‍या दिवशी दोन्ही टीमच्या मिळून 18 विकेट गेल्या. दक्षिण आफ्रिकेला 131 रन्समध्ये गुंडाळणार्‍या भारताचीही दुसर्‍या इनिंगमध्ये खराब सुरुवात झाली. वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयने भारतीय इनिंगची सुरुवात केली. सेहवागने 6 फोर मारत 32 रन्स केले. पण त्याची ही आक्रमक खेळी त्सोतसोबेनं संपवली. यानंतर मुरली विजयही झटपट आऊट झाला. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर तर रन्सचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. द्रविड 2 तर तेंडुलकर 6 रन्सवर आऊट झाले. 56 रन्समध्येच भारताचे चार प्रमुख बॅट्समन पॅव्हेलिअनमध्ये परतले. अपुर्‍या प्रकाशामुळे दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबण्यात आला असून भारताकडे आता 166 रन्सची आघाडी आहे.

डर्बन टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनं यजमान दक्षिण आफ्रिकेला दणका दिला आहे. झहीर खान झहीर खान आणि हरभजन सिंग यांनी आफ्रिकन इनिंगची ही दाणादाण उडवली. आफ्रिकेची पहिली इनिंग 131 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारताला पहिल्या इनिंगमध्ये 74 रन्सची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. भारतातर्फे हरभजन सिंगने सर्वाधिक 4 तर प्रमुख फास्ट बॉलर झहीर खानने 3 विकेट घेतल्या. झहीर खानच्या टीममध्ये परतण्याने भारतीय बॉलिंगमध्ये महत्वाचा फरक पडला आहे. आज पाचव्या ओव्हरमध्ये झहीरने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. आफ्रिकन कॅप्टन ग्रॅम स्मिथला त्याने नऊ रनवर आऊट केलं. पाठोपाठ दुसरा ओपनर पीटरसनलाही त्याने क्लीनबोल्ड केलं. या सुरुवातीच्या धक्क्यातून आफ्रिकन टीम पुढे सावरलीच नाही. धोकादायक जॅक कॅलिस रनआऊट झाला. आणि भारताविरुद्ध 300 रन्सचे ऍव्हरेज असलेल्या हशिम अमलाचा अडसर हरभजनने दूर केला. एबी डिव्हिलिअर्स, ऍशवेल प्रिन्स आणि डेल स्टेनही झटपट आऊट झाले. भारताने फिल्डिंगमध्येही एक रेकॉर्ड केला. भारताच्या राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये 200 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

close