आदर्श प्रकरणी अधिकार्‍यांना राजीनामे देण्याचे आदेश

December 28, 2010 8:49 AM0 commentsViews: 7

28 डिसेंबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याशी संबधित असलेल्या सनदी अधिकार्‍यांवर राज्य सरकारने अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे. माहिती आयुक्त रामानंद तिवारी आणि राज्य मानव अधिकार आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांना दोन दिवसांत आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सांगण्यात आले आहे. राजीनामे न दिल्यास या दोन अधिकार्‍यांविरुध्द बडतर्फची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. रामानंद तिवारी हे नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असतांना आदर्श सोसायटीची प्रक्रिया सुरु होती. सुभाष लाला हे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्याचे सचिव होते. या प्रकरणी 21 सनदी अधिकार्‍यांना आपले लिखीत स्पष्टीकरण दिल आहे. तिवारी यांचा मुलाचा तर सुभाष लाला यांची मुलगी आणि आईचा आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. दरम्यान आपण आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देऊ अशी प्रतिक्रिया रामानंद तिवारी यांनी दिली.

आदर्श घोटाळ्यात बृहन्मुंबईचे माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांचा सहभाग असल्याची माहिती आयबीएन लोकमतने दाखवली होती. रामानंद तिवारी प्रधान सचिव नगरविकास या पदावर असताना त्यांनी आदर्श सोसायटीला कायद्याचे उल्लंघन करून सोसायटी उभारण्यास परवानगी दिली. या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी रामानंद तिवारी यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

युती सरकारच्या काळात आदर्शची फाईल बंद झाली. पण 1999 साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने आदर्शची फाईल पुन्हा उघडली. या फायलीच्या अंतिम मंजुरीच्या आड येणार्‍या सर्व अनियमितता कायद्यातल्या उपविधींचा आधार घेऊन नियमित केल्या गेल्या. तसेच काही ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन करण्याबरोबरच बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. या सर्व कामात प्रमोटर्सला मोलाची साथ लाभली ती नगर विकास विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांची. नगर विकास विभागाकडून फाईल क्लीअर होण्यास कुठलीही आडकाठी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी रामानंद तिवारी यांनी घेतली. त्यांनीच आदर्शला इमारत विकासाची परवानगी दिली. एवढंच नाही, तर ही जमीन सीआरझेड-1 च्या ऐवजी सीआरझेड-2 मध्ये दाखवून तिच्यावर बांधकाम करण्यास हरकत नसल्याची टिप्पणी रामानंद तिवारी यांनीच लिहिली.

आदर्शची जमीन सीआरझेड-2 मध्ये येत असल्याचे पत्र रामानंद तिवारी यांच्या विभागाचे उपसचिव पी. व्ही. देशमुख यांच्या सहीनिशी जारी झालं. पर्यावरणाच्या परवानगीच्या रुपात नगर विकास विभागाचे पत्रच आदर्शच्या फायलीत जोडण्यात आलं आहे. त्यामुळेच आदर्शला पर्यावरणाची परवानगीच नाही हे सिद्ध झाले. या घोटाळ्याच्या सूत्रधारांना मदत केल्याची बिदागी म्हणून रामानंद तिवारी यांचा मुलगा ओंकार तिवारी आणि पी. व्ही. देशमुख यांना स्वतःला आदर्शमध्ये फ्लॅटस् मिळाले आहेत. रामानंद तिवारी सध्या राज्य माहिती आयुक्त आहेत. पण आदर्श घोटाळ्यात त्यांचा सहभाग सिद्ध झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता होत आहे.

close