संघाच्या नेत्यांना मारण्याचा कट !

January 1, 2011 9:18 AM0 commentsViews: 6

01 जानेवारी 2011

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याबद्दल आणखी एक नवा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या खटल्यातील आरोपींना जामीन देऊ नये कारण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच काही नेत्यांना मारण्याची योजना आखली होती असं महाराष्ट्र एटीएसने कोर्टात सांगितलं. मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांना ठार मारण्याची योजनाही तयार केली होती अशी गेले काही महीने चर्चा सुरू होती. एटीएसने आता कोर्टातच ही माहिती सांगितल्यामुळे सरकारी बाजुकडून पहिल्यांदाच ही माहिती समोर आणली गेली. शुक्रवारी न्यायालयात मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल पुरोहीत, अजय राहीरकर आणि राकेश धावडे यांच्या जामीनावर सुनावणी झाली.

पोलिसांनी कुठल्याही पुराव्याशिवाय आपल्याला तुरूंगात अडकवून ठेवले आहे असं म्हणणं या तिघांनी मांडले. त्यावर यातल्या कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांनी आरएसएसच्या नेत्यांना मारण्याचा कट आखला होता असं सांगत यांना जामीन देऊ नये अशी एटीएसची बाजू मांडताना विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी न्यायालयाला सांगितले.एटीएसने न्यायालयात मांडलेल्या या बाजूमुळे काही प्रश्न आता खुद्द एटीएसच्याच कार्यपद्धतीवर उभे राहीले.

संशयित कार्यपद्धत

1. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावरच्या सध्याच्या गुन्हयांमध्ये, आरएसएसच्या नेत्यांना मारण्याचा कट आखल्याचा गुन्हा नाही. जर, असा कट आखला गेला होता तर, गुन्हे दाखल करतानाच, त्यांच्याविरूद्ध एटीएसने तसे आरोप का ठेवले नाहीत ?

2. नेमक्या कुठल्या कारणांसाठी साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहितने हा कट आखला होता ?

3. आरएसएसच्या कुठल्या नेत्यांना मारण्याचा हा कट या दोघांनी आखला ?

4. एटीएस आता या दोघांवर ' कट करून व्यक्तीला मारण्याचा गुन्हा' लावणार का ?

close