पुण्यात शिक्षक दाम्पत्यांची अवहेलना

January 3, 2011 1:54 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांचं यथोचित स्मरण करावंच लागतं. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुले दाम्पत्यानं समाजाची अवहेलना आणि दगडधोंडे सहन केले. याप्रकारची अवहेलना आजही एका शिक्षक दाम्पत्याला सहन करावी लागत असल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या गंगापूर बुद्रूक गावात हनुमान शिक्षण संस्थेची इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंतची शाळा आहे. इथल्या शिक्षिका सुजाता चंद्रावळे यांना गेल्या 9 महिन्यांपासून शाळेने आपल्याला वाळीत टाकण्यात आल्याचा आरोप केला. दुपारचे जेवणही त्यांना अडगळीच्या खोलीत करण्यास भाग पाडलं जातं. विशेष म्हणजे लेखी आदेश देऊन सुजाता यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.

सुजातांचे पती आणि शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ चंद्रावळे यांना मार्च महिन्यात निलंबित करण्यात आलं. तर सुजाता यांचा मानसिक छळ करण्यात येतो. चंद्रावळे दाम्पत्य गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहे. काही शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कारस्थान रचून हा प्रकार चालल्याचा त्यांचा आरोप आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर गावकर्‍यांनी संस्थाचालकांना जाब विचारला. त्यावेळी उर्मट भाषा वापरून धमकावल्याचे गावकर्‍यांनी सांगितलं. याप्रकरणी गावकर्‍यांनी शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन दिलं आहे. पण त्यंाना इकडं लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे चंद्रावळे दाम्पत्याची परवड अजूनही सुरु च आहे.

close