अधिकार्‍यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश !

January 8, 2011 2:34 PM0 commentsViews: 5

08 जानेवारी

मुंबईनंतर आता पुण्यातही एक 'आदर्श' सारखाच घोटाळा उघड झाला. कारगिल युद्धातल्या सैनिकांसाठी निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या यादीत, सनदी अधिकार्‍यांनी घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पीएसह अनेक सरकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे. या बातमीचा पाठपुरावा आयबीएन लोकमतनं केला होता. त्यानंतर या सोसायटीमधल्या सरकारी अधिकार्‍यांची सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले आहे.

मुंबईतल्या आदर्शनंतर तसाच एक घोटाळा पुण्यातही उघडकीला आला. पुण्यातल्या लोहगाव मधली 80 एकर गायरान जमीन या जमिनीवर अनेक नेत्यांच्या संस्था आहेत. त्यांनी ही जमीन कशी मिळवली हा एक प्रश्नच आहे. पण या जमिनीलगतची ही 5 एकर जमीन, ही जमीन कारगिल युद्धात लढणार्‍या 148 आजी-माजी जवान आणि केंद्रीय सुरक्षा कर्मचा-यांच्या डिफेन्स पर्सनल हाऊसिंग सोसायटीची आहे. सरकारने 2005 मध्येही ही जमीन डिफेन्स पर्सनल हाऊसिंग सोसायटीसाठी दिली. पण 6 वर्षांनंतर या गृहनिर्माणसंस्थेच्या सभासदांच्या संख्येत अचानक वाढ झाली.आणि केवळ सुरक्षा कर्मचा-यांसाठी असलेल्या, या गृहनिर्माण संस्थेत सनदी अधिकारी, तसेच राजकीय व्यक्तींच्या जवळची लोकांची नावंही आहेत.

मोहन अडतानी,श्याम वर्धने, वसंतराव वैद्य, विकास देशमुख, बाजीराव जाधव,अश्विन मुदगल हे सर्व आयएएस अधिकारी आहेत. तर प्रदीप रासकर, सुहास वारके, विजयकुमार मगर, राजकुमार व्हटकर विश्वास पांढरे या आयपीएस अधिकार्‍यांची नावंही या यादीत आहेत. तसेच राजीव निवतकर आणि सतीश सावंत हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे पीए आहेत, त्यांचंही नाव या यादीत आहे. तसेच एस.खामकर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांचे पीए रवी शेंडगे आणि राजेन्द्र पाटील यांचीही नावं यादीत आहेत. तर चंद्रकांत खरटमल हे पुण्याचे आर.टी.ओ अधिकारी आहेत. तर डॉक्टर अलोककुमार बडगुल हे सेंट्रल रेल्वेत अधिकारी आहेत. नगररचना विभागाचे संचालक श्रीरंग लांडगे, पोलीस उपाधिक्षक पौर्णिमा गायकवाड यांचीही नावं सभासदांच्या यादीत आहेत.

या व्यतिरिक्त जवळपास 50 हून जास्त सरकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे. ही नावं या यादीत कशी आली हाच खरा प्रश्न आहे.अनेकांनी पदरमोड करुन या संस्थेचे सभासद झाले. परंतु सनदी अधिकार्‍यांनी केलेल्या घुसघोरीवर या संस्थेच्या मूळ सदस्यांनी संताप व्यक्त केला. संस्थेची पहिली यादी प्रसिद्ध असताना आणखी याद्या कशा तयार झाल्या याच्या चौकशीची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली.

या प्रकरणाचा खरा सूत्रधार आहे, एच.ए.भोसले नावाचा एअरफोर्समधला माजी अधिकारी जो या गृहनिर्माण संस्थेचा सचिव होता.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एच.ए. भोसलेंनी अनेकांकडून मोठी रक्कम घेऊन या बदल्यात त्यांना या संस्थेचं सभासदत्व देण्याचं आश्वासन दिलं. पण गेल्या 6 वर्षांपासून हा भोसले बेपत्ता आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी भोसलेंच्या अटकेची मागणी जोर धरु लागली. मुंबईतल्या आदर्श घोटाळ्यानंतर पुण्यातही नवं आदर्श उघडकीला आलं. त्यामुळे देशासाठी लढणार्‍या जवानांच्या बाबत सरकारची धोरणं किती ढिसाळ आहेत हेच पुन्हा एकदा दिसून येतं.

close