कांदा व्यापार्‍यांचं आंदोलन मागे

January 10, 2011 10:39 AM0 commentsViews: 6

10 जानेवारी

नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आज (सोमवार)आणि उद्या (मंगळवार) बंद राहणार असं आंदोलन कांदा व्यापारी सुरु केलं होतं. व्यापार्‍यांनी पहिल्यांदाच असं आंदोलन पुकारल्यानं सरकारनं व्यापार्‍यांशी चर्चेला बोलावलं होतं. दरम्यान उत्तरेतील राज्यांनी निर्बंध उचलण्याची व्यापार्‍यांची मागणी केंद्राकडे पोचवणार असं आश्‍वासन त्यांना देण्यात आलं. पणन महासंचालकांसोबत कांदा व्यापार्‍यांची बैठक झाली. त्यात व्यापार्‍यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सरकार कांदा व्यापार्‍यांवर कांदा कमी किंमतीत खरेदी करा असा दबाव टाकत आहे. या दबावाच्या निषेधार्थ कांदा व्यापार्‍यांनी आज आणि उद्या कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकला. गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या वाढलेल्या दराचा मुद्दा गाजतोय. किरकोळ बाजारातल्या कांद्याच्या किंमती नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आलंय. यासाठी सरकारनं कांद्याची निर्यातबंदी आणि व्यापार्‍यांवर धाडी अशी पावलं उचलली आहेत.

दुसरीकडे नवी मुंबईत वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे भाव उतरल्याची शक्यता आहे. आज कांद्याच्या 180 गाड्यांची आवक झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याआधी मंुबईत येणारा कांदा सडलेला असायचा मात्र आता चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात यायला सुरुवात झाली. कांद्याचा किरकोळ बाजारातला भाव 40 रू किलो असा आहे. हे दर आणखीन काही दिवसात उतरण्याची शक्यता आहे. पण नाशिक आणि लासलगाव इथल्या कांदा व्यापारांच्या आंदोलनाचा फटका आज जरी बसला नसला तरी येत्या दोन दिवसात मात्र हा फटका बसण्याची शक्यता आहे.

close