महाडच्या चवदार तळ्यात राबवणार जलशुद्धीकरण प्रकल्प

January 11, 2011 9:23 AM0 commentsViews: 74

मोहन जाधव, रायगड

11 जानेवारी

रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या चवदार तळ्याचं पाणी आता खर्‍या अर्थानं चवदार होणार आहे. या तळ्यात जल शुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय महाड नगरपालिकेनं घेतला आहे. त्यामुळे समानतेचा पायंडा पाडणारं चवदार तळं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे.

'हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे' महाडच्या चवदार तळ्याकाठी लिहीलेलं हे वचन बरंच काही सांगून जाते. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी या तळ्यातलं पाणी पिऊन तळं दलितांसाठी खुलं केलं. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांसाठी चवदार तळ्याचं पाणी तीर्थासमान आहे. पण गेल्या काही वर्षापासून तळ्याचं पाणी दूषित झालंय. त्यामुळे याठिकाणी जल शुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय महाड नगरपालिकेनं घेतला. नगरपालिका आणि राज्य सरकारच्या मदतीने जल शुद्धीकरण योजना राबवली जाणार आहे. तळ्याची स्वच्छता केल्यानंतर पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवला जाणार त्यासाठी ओझोन- टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे या ऐतिहासिक तळ्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे.

close