पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे अणुशक्ती नगर पर्यंत वाढवणार

January 11, 2011 6:21 PM0 commentsViews: 12

विनय म्हात्रे नवी मुंबई

11 जानेवारी

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दुसर्‍या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आता कळंबोली ऐवजी मुंबईच्या अणुशक्तीनगर पर्यंत वाढवला जाणार आहे. येत्या 14 मार्च पासून या कामाला सुरुवात होणार आहे.

पुण्याहून आलेला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा कळंबोली इथे संपतो. पुण्याहून निघाल्यानंतर आपण अवघ्या दिड तासात 110 किमी अंतर कापता. पण कळंबोली ते मुंबईच्या प्रवेश द्वारा पर्यंत पोहचण्यास मात्र एक तासाहून ही अधिक वेळ लागतो. ही वेळ कमी करण्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे अणुशक्ती नगर पर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारनं घेतला. दोन्ही बाजूला पाच लेनचा हा हायवे असणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आता सध्या पनवेलला येऊन संपतो. पण आता नव्यानं 25 किलोमीटरच्या रस्त्याचं विस्तारीकरण होणार आहे. नवी मुंबईतल्या याच कळंबोली सर्कलपासून पुढच्या टप्प्याचं बांधकाम सुरु होणार आहे. या हायवेच्या विस्तारीकरणाचा पहिला टप्पा कामोठे जंक्शनपासून सुरु होतो. नव्यानंच वसलेल्या कामोठे विभागाला एका उड्डाणपुलानंही जोडलं जाणार आहे.

कामोठ्यानंतर इथं आणखी एक ब्रिज येतो कोपरा इथं पण इथल्या पुलावरची वाहतूक दुहेरी व्हावी यासाठी आणखी एक मुंबईकडे जाणार्‍या रस्त्याला जोडणारा पूल बांधला जाणार आहे. यानंतर हा रस्ता खारघरहून पुढे सीबीडी बेलापूरकडे जातो. सीबीडी बेलापूरनंतर हा एक्सप्रेस हायवेचा प्रवास पोहचतो तो उरण फाट्यापर्यंत. बेलापूरच्या या खिंडीतून जाणारा रस्ता खिंडी फोडून तो अधिक रुंद केला जाणार आहे. तसेच खिंडीतूनच एक पूल बांधला जाईल तो थेट उरण फाट्याला खाली उतरेल.

उरण फाट्यावरुन पुढे जात नेरुळमार्गे हा हायवे पोहचतो सगळ्यात महत्त्वाच्या जंक्शनला ते म्हणजे तुर्भे नाक्याला. इथं मात्र उड्डाणपुलांचं आधीच मोठं जाळं आहे. पण आता हायवेचा हा टप्पा पूर्ण करण्यासाठी मोठ्या जिकरीनं याचा आराखडा बनला. तुर्भेहून पुढे जाताना रस्त्यातच येणार्‍या सानपाडा इथल्या एपीएमसी मार्केट परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्या टप्प्यातला तिसरा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. सानपाड्यातल्या उड्डाणपुलावरुन प्रवास करत हा मार्ग वाशी, मानखुर्द आणि शेवटी हा एक्सप्रेस हायवे येऊन थांबणार आहे तो अणुशक्तीनगर इथं.पण या महामार्गावरचा प्रमुख अडसर आहे. तो म्हणजे ठाणे खाडीवरील वाशीचा पूल. संपूर्ण महामार्ग हा पाच लेनचा असणार आहे. पण या खाडीवरील पूल हा 3 लेनचा आहे.

आता तब्बल 500 कोटी रुपये खर्च करुन या ठाणे खाडीवरील पूलही 5 लेनचा तयार करण्यात येणार आहे. हा पाच लेनचा पूल कसा तयार करण्यात येणार आहे. या मार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा हा खाडीपुलाचा असणार आहे. आता असलेल्या खाडीपुलालाच दोन्ही बाजूला आणखी दोन पदरी रस्त्यांचा पूल जोडला जाणार आहे. त्यामुळे मूळ पुलावर जरी वाहतूक कोंडी झाली तरी नव्या जोडमार्गामुळे ही वाहतूक कोंडी दोन्ही बाजूनं टाळता येणार आहे. पुढच्या तीन वर्षात ह्या मार्गावरुन तुम्हाला वेगानं मुंबईपर्यंत लवकर पोहचता येईल.

close