राज ठाकरेंचे आरोप नैराश्यातून – अजित पवार

January 13, 2011 12:46 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी

राज ठाकरेंनी माझ्यावर आणि आर.आर.पाटील यांच्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. मारहाणीचे आदेश मी दिले आहेत असं जर का हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं असतं तर मला वाईट वाटलं असतं. पण राज यांचं बोलणं म्हणजे नैराश्याचं बोलणं आहे ते काय बोलत होते त्याचं त्यांना भान नव्हतं. ते मुख्यमंत्र्यांनासुद्धा वाईट बोलले आपण काय बोलतोय त्याचंही त्यांना भान नव्हतं.अशा बोलण्यामुळे राज ठाकरे लोकांच्या मनातून उतरतील असंही अजित पवार यांनी सांगितलं.

काल बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जंगी सभा घेतली. मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी जाधव यांना गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी मारहाण केल्याच आरोप राज ठाकरेंनी केला. जाधव यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. पण जाधव हे मनसेत दाखल झाले त्यामुळे आर.आर.पाटील यांनी जाधव यांच्यावर राग काढण्यासाठी ही मारहाण घडवून आणल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला होता .

close