प्रभाकर पणशीकर यांचं निधन

January 13, 2011 4:59 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. पणशीकर यांना काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा तिसरा धक्का बसला होता. त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये दाखल ही करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सतत चढ उतार होत होते. अखेर प्रभाकर पणशीकर यांनी जगाचा निरोप घेतला.

1962 सालापासून प्रभाकर पणशीकर रंगभूमीवर लोकप्रिय झाले ते लखोबा लोखंडे या नावानं. त्यांच्या तो मी नव्हेच नाटकानं नाट्यसृष्टीत एक इतिहासच तयार केला. नाटकात लखोबा लोखंडेची विविध रूपं त्यांनी अनेक वर्ष सहजपणे साकारली. याशिवाय अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, थँक यु मिस्टर ग्लॅड, भटाला दिली ओसरी, जेव्हा गवताला भाले फुटतात ही त्यांची नाटकं विशेष गाजली. प्रभाकर पणशीकरांनी स्वत:ची नाटक कंपनी नाट्यसंपदा ही स्थापन केली. संगीत मदनाची मंजिरी, संगीत सुवर्ण तुला, कट्यार काळजात घुसली, अंधार माझा सोबती, किमयागार अशा अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती नाट्यसंपदेनं केली. त्यांचं आत्मचरित्र असलेलं तोच मी हे पुस्तकही विशेष गाजलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, जीवनगौरव असे अनेक मोठे पुरस्कार त्यांना मिळाले. पण यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रसिकांच्या मनावर कायमचं राज्य त्यांनी केलं.

close