शहीद चौगुलेंच्या मारेकर्‍याला अटक

January 16, 2011 9:09 AM0 commentsViews: 2

16 जानेवारी

बुलढाणा जिल्ह्यातल्या पंतनगरमध्ये राहणार्‍या गोलू तायडे आणि त्याचा साथीदारांना पकडण्यासाठी गेलेले अमरावती क्राईम ब्रॅन्चचे पोलिस सब इन्स्पेक्टर संजय चौगुले यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेला काही तासातचं गोळ्या झाडणार्‍या दरोडेखोर गोलू तायडेला भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी सापळा रचून दरोडेखोरला अटक केली.

संजय चौगुले आणि अमरावती क्राईम ब्रॅन्चची टीम बुलढाणा इथल्या मलकापूरमध्ये या आरोपींना पकडण्यासाठी गेेली होती. दरोडेखोर तायडे यानं अमरावतीतील एका व्यापार्‍यावर गोळीबार केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पीसीआय चौगुले यांनी या आरोपींचा पाठलाग केला. या दोघांमध्ये झालेल्या चकमकीत चौगुले शहीद झाले. रात्री साडे बारा वाजता ही दुदैर्वी घटना घडली. याप्रकरणात आतापर्यंत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. संजय चौगुले कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजचे होते. 6 वर्षांपासून ते अमरावतीत सेवा बजावत आहेत. गेल्या वर्षभरापासून ते क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 4 वर्षांची मुलगी आहे.

दरम्यान, दरोडेखोरांच्या गोळीबारात शहिद झालेल्या पी एस आय चौगुले यांना अमरावतीच्या पोलिस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. बंदुकीच्या तीन फेर्‍या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. दुपारी 3.30 वाजता चौगुले यांचं शव अमरावतीत पोलिस मुख्यालयात आणण्यात आलं. यावेळी चौगुले यांचे आईवडीलही उपस्थित होते. मुलाचं शव पाहतांना त्यांना शोक अनावर झाला. सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येनी यावेळी उपस्थित होते. संजय चौगुले अमर रहे या घोषणेतच चौगुले यांचं शव कोल्हापूरकडे रवाना करण्यात आलं.

close