विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाकडे सरकारचं दुर्लक्ष

January 17, 2011 7:39 AM0 commentsViews: 84

रायचंद शिंदे, जुन्नर

17 जानेवारी

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा मृत्यूनंतरही उपेक्षा सुरु आहे. विठाबाई यांचा शेवट अतिशय हलाखीत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी विठाबाईंचं उचित स्मारक बांधण्याचं आश्वासन दिलं. पण हे आश्वासन हवेतच विरलं.

पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची असं म्हणत विठाबाई नारायणगावकर यांनी तमाशा कला आयुष्यभर जोपासली. आठ वर्षांपूर्वी विठाबाई यांचा हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगावमध्ये त्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला. पण ही घोषणा अजूनही कागदावरच आहे. या स्मारकासाठी सरकार दोन एकर जमीन देऊ शकत नाही का असा उद्विग्न सवाल विठाबाईंच्या मुलगा विजय सावंत यांनी केला आहे.लोकनाट्य तमाशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचं श्रेय विठाबाईंना जातं. वयाच्या 8 व्या वर्षांपासून ते सत्तरीपर्यंत विठाबाईनी तमाशाचा फड जागता ठेवला. तंबूमागे बाळंतपण उरकून रसिकांच्या आग्रहासाठी त्याच अवस्थेत फडावर घुंगूरबोल उमटवणारी ही कलावंतीण. पण उतारवयात त्यांना वाईट दिवस पहावे लागले. त्यावेळी सरकारनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं.विठाबाईंच्या या स्मारकाबाबत बहुतेक मंत्र्यांनी अनुकुलता दाखवली. यासाठी एक समिती स्थापन करुन अनेकदा बैठका झाल्या. जागानिश्चितीसाठी मुंबईच्या एका पथकानं पाहणी केली. पण आता स्मारकाचं काम लाल फितीत अडकलं. स्मारकाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारणा केली. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. उपेक्षेचं जगणं वाट्याला आलेल्या विठाबाईंची स्मारकाबाबत तरी उपेक्षा होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

close