पुण्यात इमारतीची चुकीची परवानगी दिल्याने 4 अधिकारी निलंबित

January 19, 2011 4:30 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

19 जानेवारी

सरकारी अधिकारी आणि बिल्डर्सच्या संंगनमतानं झालेल्या घोटाळ्यांची चर्चा आता रोजचीच झाली. पुण्यातही अशाप्रकारचा एक घोटाळा उघडकीस आला. एका रहिवासी इमारतीच्या जागी चक्क पार्किंगचं ठिकाण असल्याचं दाखवुन दुसरी इमारत उभारण्यासाठी परवानगी दिल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकारामुळे 48 कुटंुबांचं भवितव्य धोक्यात आलं. तर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन 4 अधिकार्‍यांंना निलंबित करण्यात आलं आहे.

पुण्यातील कर्वेनगरच्या अमृतकलश हौसिंग सोसायटीतली अजीता इमारत तर दुसरी अनुजा इमारत. या पैकी अजीता इमारत उभारतांना अनुजा इमारतीची जागा पार्किंगसाठी दाखवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनुजा इमारत 8 वर्षापूर्वीच उभारण्यात आली. आणि ही इमारत उभारण्यासाठीची परवानगीसुध्दा महानगरपालिकेनंचं दिली होती. पण आता ही जागा पार्किंगसाठी असल्याचं महापालिका अधिकार्‍यांनी दाखवल्यानं या इमारतीत राहणार्‍या 48 कुटुंबांचं भवितव्य धोक्यात आलं. हा घोटाळा केल्याचा आरोप प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या शिरिष रिसवडकर यांच्यावर करण्यात आला. आता त्यांच्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

आता हा घोटाळा झाल्याचं मान्य करत आयुक्तांनी दोषींवर कारवाई केली. यात उप-अभियंता आशिष जाधव, उप-अभियंता संदीप रनावरे, उप-अभियंता सुकुमार पाटील, उप-अभियंता धनंजय गायकवाड यांना निलंबित करण्यात आलं. अधिकार्‍यांवर तर कारवाई झाली पण आता बिल्डर आणि आर्किटेक्टवरील कारवाईचं काय आणि त्या निर्दोष 48 कुटुंबांसाठी महापालिका काय करणार असा सवाल आता विचारला जात आहे.

close