रायगडात धरण बांधा पण पुर्नवसन करा शेतकर्‍यांची मागणी

January 20, 2011 4:26 PM0 commentsViews: 2

मोहन जाधव, रायगड

20 जानेवारी

आधी पुर्नवसन आणि मग धरणं असं राज्य सरकारचं धोरण आहे. मात्र या धोरणाची पायमल्ली सध्या रायगड जिल्ह्यात होतं आहे. धरणाच्या नावाखाली शेतकर्‍यांना सक्तीने त्यांच्या शेतातून बेदखल करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र प्रशासन आणि लोक प्रतिनिधी गप्प आहेत.

कोलाडपासून 10 किमी अंतरावर पहूर गावात लघु पाटबंधारे विभागानं इथे धरण बांधायचा निर्णय घेतला. पण शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच इथे कामाला सुरुवात करण्यात आली असा गावकर्‍यांचा आरोप आहे. शेतकर्‍याच्या जमिनीवर भरावही टाकण्यात आलेत. या प्रकल्पासाठी 90 एकर जागा संपादीत केली जाणार आहे. आतापर्यंत 10 टक्के शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला.

पण उरलेल्या 90 टक्के शेतकर्‍यांनी मोबदला स्वीकारायला नकार दिला. इथली शेतीच नष्ट झाली तर करायचं काय हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मात्र या प्रकरणी कुठलाही हस्तक्षेप करायला नकार दिला. तसेच भूसंपदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम थांबवण शक्य नाही असं जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

सत्ताधिकारी ऐकत नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी विरोधकांनाही जागं करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचं आश्वासनं दिलं ही होतं. पण धरण बांधा पण पुर्नवसनही करा अशीच इथल्या शेतकर्‍यांची मागणी आहे.

close