यंदा मुंबईकर हापूस आंबा खाणार का ?

January 20, 2011 4:52 PM0 commentsViews: 22

विनय म्हात्रे, नवी मुंबई

20 जानेवारी

थंडी संपली की खवैय्यांना वेध लागतात ते आंब्याचे पुढच्या दोन महिन्यात कोकणातला हापूस आंबा मुंबईत दाखल होणार आहे. यंदा कडाक्याची थंडी असल्यानं आंब्याला मोहरही चांगलाच आहे. हापूस आंबा कार्बाईड वापरुन पिकवला गेल्यानं गेल्या हंगामात बर्‍याच मुंबईकरांनी हापूसला नाकारलं होतं. पण यंदा मुंबईकर हापूसला स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

हापूस आंबा…सर्वांच्याच आकर्षणाचं फळ पण पिवळा धमक दिसणारा हापूस नैसर्गिकरित्या पिकला असेल तर त्याची चव काही औरच असते. पण गेल्या काही वर्षांपासून हाच आंबा कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवला जातो. त्यामुळे शरीराला अपाय होत असल्यानं ग्राहकांनीही त्याकडे पाठ फिरवली. याप्रकरणी फूड आणि ड्रग्स विभागाने आंबा व्यापार्‍यांवर धाडीही टाकल्या. यावर्षी कोकणातून साधारण 350 कोटी रुपयांचा हापूस आंबा मुंबईत दाखल होईल असा अंदाज आहे.

हापूस आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेकडे सरकारनं थोडं लक्ष घालण्याची गरज होती. शिवाय एपीएमसीसोबत एक बैठक घेणंही आवश्यक होतं. पण वर्षभरात एकही बैठक झाली नाही. यात सर्वसामान्य व्यापारी आणि आंबा उत्पादक भरडला जाणार असल्यानं काहीजण त्यावर उपायही सूचवताहेत. कोकणातल्या एकूण उत्पादनापैकी अर्धा टक्का आंबा हा अमेरिकेला निर्यात करता यावा यासाठी एपीसीएमसीचा रेडिएशन प्लान्ट तयार होतो. उर्वरित आंब्याची काळजी घेण्याकरता एपीएमसीच काय सरकारही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतं. ऐनवेळेस सरकारनं पावलं जरी उचलली तरी ती वेळ आता टळून गेली.

close