बिल्डरांनी केला ‘कात्रजचा घाट’!

January 21, 2011 4:03 PM0 commentsViews: 10

21 जानेवारी

पुण्यातल्या टेकड्या आणि डोंगरांचा प्रश्न गाजत असतानाच आता त्यामध्ये आणखी एका डोंगराची भर पडली आहे. हा डोंगर आहे कात्रजचा. पुण्याहुन सातार्‍याकडे जाणार्‍या रस्त्यावरच्या कात्रज बोगद्यावरचाच डोंगर गिळुन तिथे निवासी सोसायटी उभी करायला परवानगी देणारा निर्णय राज्य शासनाने काढला आहे. टेकडीचे निवासी झोनमध्ये रुपांतर झाल्यानंतर तो खणुन तिथे रस्ता करण्याचंही काम सुरु झालेलं आहे. त्यातही आश्चर्य म्हणजे नगररचना विभागाच्या संचालकांनी हा डोंगर निवासी झोनमध्ये करण्यास विरोध केला होता. पण हा विरोध झुगारत हा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे कोळेवाडीमधल्या सर्व्हे क्रमांक आठ आणि बाराची जमीन निवासी करण्यात यावी अशी मागणी कात्रज हिल क्लब ऍण्ड रिसॉर्टसाठी दर्शना दामले यांनी शासनाकडे अर्ज केला होता. त्याबाबत ना हरकत सुचना मागवणारी जाहिरात मुंबई चौफेर या दैनिकात देण्यात आली. त्यानंतर एकाही माणसाने ना हरकत सुचना दिली नाही असं म्हणत नगररचना संचालक आणि सहायक संचालकांचा अभिप्राय मागवण्यात आला. त्यांनी विरोधात अभिप्राय नोंदवुनही या जागेचे निवासी झोन मध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. यानंतर त्यांनी बांधकाम आराखडा तसेच ही जमीन अकृषक झोन मध्ये बदलण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. तो मंजूर होण्याच्या आधीच या ठिकाणी रस्ता बनवायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात पुण्याचं नुकसान करणारे अशा स्वरुपाचे अनेक निर्णय घेण्यात आले. कात्रजच्या जमिनीबाबतचा निर्णय हा त्यातलाच एक असल्याचं दिसतंय. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

close