सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी सर्व 11 आरोपी अटकेत

January 26, 2011 5:04 PM0 commentsViews: 5

26 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सर्व 11 आरोपींना अटक केली आहे. काल 7 जणांना अटक केल्यानंतर आज आणखी चौघांना अटक करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मुलगा कुणाल शिंदे यालाही पोलिसांनी आज अटक केली. तर ज्या टँकरमध्ये भेसळ सुरू होती त्या टँकरचा ड्रायव्हर, क्लिनर या दोघांना अटक करण्यात आली. ड्रायव्हर इम्रान खान आणि क्लिनर हक्कानी खान अशी त्यांची नावं आहेत. तर त्यातला एक आरोपी अजय सोनवणे मात्र फरार होता. त्यालाही संध्याकाळी अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातला मुख्य आरोपी पोपट शिंदेला मुंबईतल्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. आरोपी शिंदे गंभीर-रित्या भाजला गेला. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणातल्या 6 आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील या तेलमाफियांवर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केला. पण छगन भुजबळ यांनी हे सर्व आरोप फेटाळत ख़डसे जळीतकांडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला.

गृहखात्यानं चिंतन आणि मनन करण्याची गरज- कदम

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात वनमंत्री पतंगराव कदम यांनीही आता राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. तेल माफियांकडून अधिकार्‍यांवर हल्ले होत असतील तर आता गृहखात्यानं चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे, असं पतंगराव कदम यांनी म्हटलं आहे. शिवाय अशा माफीयांना जर राजकारणी पाठीशी घालत असतील तर त्यांनीही चिंतन करावे असंही ते म्हणाले. सांगलीत जिल्हा पोलीस ग्राऊंडवर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पतंगराव कदम बोलत होते.

close