भाजपच्या तिरंगा यात्रेला ओमर अब्दुल्ला सरकारनं रोखलं

January 26, 2011 5:25 PM0 commentsViews: 8

26 जानेवारी

भाजपच्या तिरंगा यात्रेला ओमर अब्दुल्ला सरकारनं आज श्रीनगरला जाण्यापासून रोखलं. यात्रा रोखून भाजपच्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, अनुराग ठाकूर, अनंतकुमार या नेत्यांना आज दुपारी अटक करण्यात आली होती. त्यांची नंतर सुटकाही करण्यात आली. त्यानंतर यात्रा संपल्याचे जाहीर करतानाच भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर कडक टीका केली. तर दिल्लीतही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अब्दुल्ला सरकारला धारेवर धरलं.

त्याआधी ही खोर्‍यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीनगरच्या लाल चौकाजवळ तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करणार्‍या 6 भाजप कार्यकर्त्यांना सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अडवलं आणि अटक केलं.रिगल चौकात तिरंगा घेऊन लाल चौकाकडे निघालेलेया हरयाणातल्या एका भाजप नेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. भाजपच्या नेत्यांचे काश्मिर खोर्‍यात तिरंगा फडकावण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले तरी खोर्‍यात हिंसा काही थांबली नाही. जम्मू-काश्मीरचे अर्थमंत्री अब्दुल रहीम रादर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमारसुद्धा केला. सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच ही घटना घडली.

close